मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना साथीचा संसर्ग रोखण्यासाठी मंगळवेढ्यातील प्रशासन जंगजंग पछाडत असताना याचा गैरफायदा घेऊन जीवनावश्यक रेशनचे धान्य वेळेत ग्राहकांना न देणे , दुकान वेळेत न उघडणे आणि अरेरावीची भाषा वापरणे या कारणाने शिवणगी येथील रेशन दुकान तात्पुरत्या कालावधीसाठी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी निलंबित केले.
कोरोना साथीचा प्रादुर्भाव राज्यात सुरू झाल्यापासून आरोग्य , महसूल आणि पोलिस प्रशासन कडक पावले उचलत आहे. जिल्ह्यात संचारवंदीचे आदेश सर्वात आधी देण्यात आले . शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्याचे नियोजन केले.
तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी यापूर्वीच जीवनावश्यक वस्तू असलेल्या किराणा मालाची विक्री चढ्या दराने केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता . त्यातच शिवणगी येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडून येथील कार्डधारकांना वेळेत माल न देणे , माल कमी देणे , मालाची पावती न देणे , अरेरावीची भाषा वापरणे अशा तक्रारी येथील ग्रामस्थांनी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत तहसीलदार रावडे यांनी कारवाई केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज