टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या ऊत्साह आणि भक्तीभावात संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विवाह सोहळ्यासाठी मंदिराच्या सभामंडपात मंदिर समितीचे सदस्य व कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधी आदी मोजकेच लोक उपस्थित होते.
त्याचबरोबर संध्याकाळी साध्या पध्दतीने नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.मंगळवार दि. 16 रोजी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचीही लगीनघाई सुरू होती.
विठ्ठल मंदिरातील सभामंडपात भव्य मंच सजवण्यात येत होता आणि त्याला आकर्षक फुलांची रोषणाई करण्यात आली होती.विठ्ठल आणि रखूमाईचा गाभारा विविध प्रकारच्या रंगीत, सुगंधीत फुलांनी लगीन घरासारखा सजवला होता.
तर एरवी टाळ मृदंग आणि विठ्ठलाच्या नामघोषाने गजबजणार्या विठ्ठल मंदिरात मंगळवारी मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित व-हाडी मंडळी यांची लगबग होती. बाहेर सोन्याचे बाशिंग बांधून देवाचं लगीन लावण्यासाठी मोजकीच वर्हाडी मंडळी मोठ्या ऊत्साहाने या लग्नसोहळ्यास उपस्थित होती.
वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता, अशी आख्यायिका आहे. त्यानुसार दरवर्षी हा विवाह सोहळा मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात साजरा करून परंपरा जपत आहे.
हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणून संपूर्ण मंदिर आणि गाभारा झेंडू, शेवंती, गुलाब, निशीगंध, ऍथोरीयम, ऑरकेड, कामीनी, तगर, अष्टर, बिजली, ग्लॅडीओ, जरबेरा, ड्रेसेना, तुळशी, इतर प्रकारच्या २५ ते ३० जातीच्या ५ टन आकर्षक फुलांनी सजविला होता.
पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी मोफत फुलांची आरास केली. सकाळी ११ वाजता श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने सजविले गेले.
तर विठ्ठलासही पांढर्या शुभ्र वस्त्र आणि सुवर्णालंकारांनी सजवले होते. बंगळूर येथील भाविक सविता चौधरी यांनी विठ्ठल रुक्मिणीस त्यांनी स्वतः बनवलेला पोशाख श्रीस घातला होता.
रुक्मिणीमातेच्या गाभार्यातून श्री विठ्ठलाकडे गुलाल नेला आणि तिथे गुलालाची उधळण केली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणीमातेकडे नेण्यात आला व तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.
त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे अलंकाराने सजविलेली उत्सवमूर्ती सभामंडपात विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणली गेली.
यावेळी दोनीही देवतांना मुंडावळ्या बांधल्या होत्या. अंतरपाट धरण्यात आला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सपत्नीक विवाह लावण्यात आला.
उपस्थिती वर्हाडी मंडळींना फुल आणि अक्षता वाटप केल्यानंतर मग मंगलाष्टका संपन्न झाल्या. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून आणि टाळ-मृदुंगाच्या जयघोष केला. उपस्थित वर्हाडी मंडळींनी विवाह संपन्न झाल्यानंतर आनंदाच्या भरात गाण्यावर ठेका धरला.
या विवाह सोहळ्यास मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्य व नगराध्यक्षा साधनाताई भोसले, शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी मंदिर समितीचे सदस्यांसह मोजकेच वर्हाडी मंडळी या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.
विवाह सोहळ्यानंतर उपस्थित वर्हाडी मंडळींना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज