टीम मंगळवेढा टाईम्स ।
आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले आहेत.येत्या काही दिवसांत केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून धडकणार आहे. दरम्यान, पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील
अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, विदर्भातील काही भागात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून तापमानाचा पारा चढाच राहणार आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हालचालीसाठी दक्षिण भारतात पोषक हवामान निर्माण झालं आहे. त्यामुळे संबंधित परिसरात बहुतांशी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर काही
ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. अंदमान निकोबार बेटांवरील बहुतांशी ठिकाणी नैऋत्य मान्सूनचं आगमन झाल्यानंतर आता दक्षिण बंगालच्या उपसागरात देखील मान्सून धडकला आहे.
याचा एकंदरीत परिणाम म्हणून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज
पुण्यासह सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे.
येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.अकोला जिल्ह्यांत हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
उर्वरित महाराष्ट्रात मात्र उष्णतेची दाहकता कमी झाली असून तापमानाचा पारा किंचित घसरला आहे. पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात
हीच स्थिती कायम राहणार असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज