टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढ्यातील नियोजित स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेली नवीन समिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पत्रामुळे रद्द झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
बसवेश्वरांची जयंती मंगळवारी सर्वत्र साजरी होत असताना त्यांच्या स्मारकाच्या उभारणीतील सरकारी दिरंगाईची बाब समोर आल्यानंतर मंगळवेढा येथे बैठक घेण्याचे ठरले आहे.
नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार गंगाधर पटने हे या बैठकीसाठी येथून रवाना झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे लिंगायत समाजाचा घात झाल्याचे पटने यांनी नमूद केले.
महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पूर्वीच्या समितीची पुनर्रचना करण्याबाबतचा निर्णय ११ मार्च २०२२ रोजी जारी केला होता.
स्मारक बांधकामाचा प्रस्ताव तयार करणे, बांधकाम खर्चाचा आराखडा तयार करणे तसेच बांधकामावर सनियंत्रण ठेवणे यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार करताना त्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सामावून घेण्यात आले होते.
काँग्रेसशी संबंधित तीन जणांचा या समितीत समावेश होता; पण त्यानंतर महिनाभरातच ग्रामविकास विभागाने ही समिती रद्द करण्यासंबंधीचा नवा निर्णय जारी केला.
स्मारक समिती शासनाने रद्द केल्याची माहिती गेल्या आठवडय़ात समोर आल्यानंतर त्यावर लिंगायत बांधवांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. शासनाच्या नव्या निर्णयात समिती रद्द करण्यामागचे कारण नमूद केलेले नव्हते;
पण आता समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २२ मार्च २०२२ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या एका पत्रामुळे पुढच्या पंधरवडय़ातच समिती रद्द करण्यात आली.
वरील समिती जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे एक पदाधिकारी विजयकुमार हत्तुरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे एक निवेदन पाठविले होते.
स्मारक उभारण्यासाठीच्या समितीमध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश झाला नसल्याची तक्रार त्यांनी पटोले यांच्याकडे केली होती. त्यांचे हे निवेदन आपल्या पत्रासोबत जोडून पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.
त्यात सदर समितीला स्थगिती देण्याची तसेच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नव्याने समिती गठीत करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यानुसार पुढील कारवाई झाली असावी, असे येथे मानले जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना परस्पर पाठविलेल्या पत्राबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांना त्याबद्दल माहिती नव्हती, असे येथे दिसून आले.
दि.१ मे च्या महाराष्ट्रदिनी गंगाधर पटने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून बसवेश्वरांच्या स्मारकासंबंधी चाललेल्या घोळाकडे त्यांचे लक्ष वेधले. याच पत्राची प्रत त्यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनाही सादर केली.
समिती रद्द करताना कोणतेही कारण देण्यात आले नाही. तेव्हा शासनाचे याबाबत नेमके काय धोरण आहे ते स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली.
वरील समिती रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे ३ मे रोजी प्राथमिक बैठक घेण्यात येत असल्याचेही पटने यांनी या पत्राद्वारे कळविले.(स्रोत:लोकसत्ता)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज