टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होते.
त्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने आगामी पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. परिचारक यांनी पवारांच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीचे राजकीय वर्तुळात कुतुहल आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेली पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास अद्याप अवधी असतानाच राजकीय नेतेमंडळींनी जनसंपर्कासाठी धावाधाव सुरू केली आहे.
राज्यात नाट्यमय घडामोडी घडून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले.त्यानंतर सत्तेचा गोडवा मिळावा; म्हणून भाजपवासी झालेले अनेक जण परतीच्या मार्गावर आहेत. त्याची सुरुवात पंढरपुरातून कल्याणराव काळे यांनी शरद पवारांची भेट घेत पवारांवर स्तुतीसुमने उधळत केली.
कोवीडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सध्या मतदारसंघामध्ये दामाजी साखर कारखाना, पोटनिवडणुकीतील उमेदवार आणि इच्छुकांचा संपर्क याबाबतची चर्चा जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीही आतापर्यंत पक्षाच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर दौऱ्यात भाजपचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता, त्यामुळे भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली होती.
प्रशांत परिचारक यांच्या हालचाली पाहून भाजपने सोलापूर जिल्हा कार्यकारिणीत आमदार परिचारक यांच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले होते. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतील गटनेता निवडीची जबाबदारीही परिचारक यांच्यावर भाजपने सोपवली होती,
त्यामुळे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न भाजपकडून हरतऱ्हेने सुरू आहे. त्याची चर्चा थांबते न थांबते तोच परिचारकांच्या राजकारणाचे पडद्यामागील सूत्रधार तथा त्यांचे बंधू युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी आज शरद पवारांच्या सोलापूर दौऱ्यात लावलेली हजेरी लक्षवेधक ठरली आहे.
उमेश परिचारक हे मंगळवेढा तालुक्यात युटोपियन साखर कारखान्याच्या माध्यमातून मुक्कामी आहेत. त्यामुळे साखर कारखानदारीत ऊस दर देण्यापासून कारखानदारी चालवण्यापर्यंत त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे कारखानदारीतील अभ्यास राजकीय पडद्यावर येणार का? याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
पंढरपुरात तीन आमदार एकत्र येऊन कृषि विधेयकाला पाठिंबा देत असताना उमेश परिचारक मात्र शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने मतदारसंघामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
मंगळवेढ्यात दामाजी कारखान्याची निवडणूक की पोटनिवडणूक आदी होणार याची चर्चा सुरू असली तरी परिचारकांच्या भेटीमुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज