टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील नऊ ते अकरा गावांमध्ये म्हैसाळच्या योजनेतील पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांना दिल्या आहेत.
तसेच या भागातील लाभार्थी शेतकऱ्यांनी देखील म्हैसाळच्या पाण्यासाठी मागणी अर्ज त्वरित भरून द्यावेत असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात यंदा कमी पावसामुळे पाणी पातळी खाली गेली आहे. सध्या फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे या भागात शेतीच्या पाण्यासाठी गरज भासू लागली आहे.
या भागातील लोणार, पडळकरवाडी, सलगर लोणार, महमदाबाद (हु.) आसबेवाडी, लवंगी, येळगी, हुन्नूर, रेवेवाडी, मारोळी, शिरनांदगी या भागात म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यातील कामे बऱ्यापैकी पुर्ण झाली असून या कामामुळे या परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यास काहीच अडचण नाही.
सध्या या भागात शेतकऱ्यांना पिकांना जोपासण्यासाठी व उन्हाळी पिके जोपासण्यासाठी पाणी मिळणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी दुष्काळ असणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे.
यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून ही योजना मार्गी लावली आहे. म्हैसाळच्या सहाव्या टप्प्यातील योजनेमुळे दक्षिण भागातील नऊ ते अकरा गावांमधील हजारो हेक्टर शेतीच्या मातीचा पोत सुधारून बागायती क्षेत्र वाढणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती निर्माण होणार आहे.
तसेच सदर आवर्तनामुळे शेती उपयोगी जमिनीची धूप नियंत्रणात येऊन ते क्षेत्र शेतीउपयोगी होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांची अनेक दिवसापासून ची शेतीसाठी पाणी मिळण्याची मागणी पूर्ण होत आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी या योजनेतून पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा झाला होता. तसेच काही भागातील पाझर तलावात देखील पाणी सोडता येत असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता होणार आहे.
या भागात सध्या शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने या योजनेतून पाणी सोडण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आ.आवताडे यांच्याकडे मागणी केली आहे.
दि.23 रोजी आमदार आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीबाबत पाठपुरावा करत या योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांना म्हैसाळच्या या योजनेतून या भागातील शेतकऱ्यांसाठी आवर्तन सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी अभियंता पवार यांनी पाणी सोडण्याबाबत आश्वासन दिले.
तसेच या भागातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज तातडीने भरुन देण्यास सुचविले असुन, यावर आमदार आवताडे यानी मागणी अर्ज घेण्यासाठी या भागात आपले कार्यालयाचा एक प्रतिनिधी देण्या बाबत आदेश दिले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी सभापती प्रदीप खांडेकर, प्रा. येताळा भगत सर, उपसभापती सुरेश ढोणे, भारत गरंडे, जगन्नाथ रेवे, मानेवाडीचे सरपंच दत्ता मळगे, राजु पुजारी, ब्रह्मदेव रेवे, होळकर सर, काका मिस्कर, बाळू घुमरे, पडोळकरवाडीचे सरपंच मरगु कोळेकर व भागातील शेतकरी उपस्थित होते.
आ.समाधान आवताडे यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज तात्काळ भरून संबंधित विभागाच्या प्रतिनिधीकडे द्यावेत तसेच यासंदर्भात आपणास काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ही आमदार आवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज