त्या पाेलिस कर्मचार्यावर पोलिस अधिकारी कारवाई करणार की पाठीशी घालणार याकडे नागरिकांच्या लागल्या नजरा…..!
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील गट नं. 53/3 येथे बांधकाम ठिकाणी बेकायदा 4 ब्रास वाळूचा साठा केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी व त्याच गावातील एका व्यक्तीस या वाळू साठा प्रकरणी 1 लाख 56 हजार रुपयांचा दंड तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दंड ठोठावल्याचा आदेश पारित केला आहे. Notice issued to another along with police personnel for illegal sand hoarding mangalwedha police station
लक्ष्मी दहिवडी येथील एक पोलिस कर्मचारी मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असून गट नं. 53/3 मध्ये घराचे बांधकाम सुरु आहे.सध्या जिल्हयात मागील अनेक महिन्यापासून कुठेही शासकीय वाळू लिलाव झाला नसताना या बांधकामावर चार ब्रास अनधिकृत वाळू कोठून आली असा संशय पाहणार्या नागरिकांना आल्याने सदर नागरिकांनी तहसीलदार यांचेकडे तक्रार केल्यानंतर संबंधित गावचे तलाठी यांना अनधिकृत वाळू साठयाचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यानंतर तलाठयांनी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.यामध्ये गावातील एका व्यक्तीने 53/3 मध्ये केलेला वाळू साठा हा माझा असल्याचा दावा केला आहे.
मात्र या दाव्यावर ग्रामस्थांतून उलट सुलट चर्चा सुरु झाली असून त्या पोलिसाला वाचविण्यासाठी हा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. सदर घटना वादग्रस्त झाल्याने तहसीलदार यांनी 4 ब्रास वाळू साठयावर चालू बाजार भावाच्या पाचपट रकमेप्रमाणे 1 लाख 56 हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस दोघांनाही बजावली आहे. या वादाची शहनिशा करण्यासाठी आता महसूल प्रशासनाकडून जागेचा उतारा काढून तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते.
सात दिवसाचे आत दंड भरण्याचे आदेश पारित केले आहेत.अदयापही गौण खनिज विभागाकडे दंड न भरल्याने व मुदत संपल्याने आता 7/12 वर बोजा चढविण्याची प्रक्रिया गौण खनिज विभागाकडून होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान,ही वाळू बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन अडवून यावर पोलिस कारवाई न करता ते वाहन थेट बांधकामावर आणल्याची खमंग चर्चा सुरु आहे.यावर पोलिस अधिकारी कारवाई करणार की कर्मचार्याला अभय देणार? याकडे तमाम सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान,तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यात ग्रामस्थांसमोर गट क्रमांक 53/3 येथे सुरु असलेले अर्धवट बांधकाम हे त्या पोलिस कर्मचार्याचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे तर त्या इसमाच्या पंचनाम्यात गट नं. 53/3 येथे राहण्यासाठी घर बांधत असून दि. 24 मे रोजी त्या बांधकामासाठी वाळू साठा केल्याचे जबाबात म्हटले आहे. परिणामी एकाच गट क्रमांकामध्ये दोघांनी पंचनाम्यात बांधकामाचा अजब दावा केल्याने पंचक्रोशीत या बांधकामाची रंगतदार चर्चा रंगली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज