मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
मंगळवेढा येथील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून स्वतंत्र फिडर नसल्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. परिणामी उत्पादनांवर परिणाम होत असल्यामुळे उद्योगांचे आर्थिक नुकसान होत आहे.
मंगळवेढा औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वाधिक क्षेत्र हे सौर प्रकल्पांनी व्यापल्यामुळे इतर प्रकल्पांना पुरेशी जागा उपलब्ध नाही. आहे त्या जागेत नागपूर, रत्नागिरी व टेंभुर्णी- विजयपूर या महामार्गामुळे उत्पादित मालाला बाजारपेठ आणि आवश्यक तो कच्चा माल तत्काळ औद्योगिक वसाहतीमध्ये आणणे सोईचे झाल्यामुळे येथे अनेक छोटे-मोठे उद्योग सुरू आहेत.
त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा केलेल्या फिडरवर अन्य गावे असल्यामुळे त्या गावाचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत पुरवठा दुरुस्त होईपर्यंत पूर्ण फिडर बंद ठेवावा लागत आहे.
परिणामी औद्योगिक वसाहतीमधील उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यासाठी अनेक बँकांची मदत घेतली आहे. सातत्याने वीज खंडित झाल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. मागणीप्रमाणे मालाचा पुरवठा होऊ शकत नाही.
त्यामुळे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे देखील अडचणीचे होत आहे. त्या दृष्टीने या औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या ३७ उद्योजकांनी त्याबाबतची मागणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व आमदार समाधान आवताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
तालुक्यात नवीन उद्योगधंदे येणे अवघड
एका बाजूला मंगळवेढासारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये नवनवीन उद्योग येणे अडचणीचे ठरत आहे आणि आहे ते उद्योग टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र महावितरणकडून स्वतंत्र फिडर दिला नसल्यामुळे भविष्यात येथील उद्योगांवर देखील परिणाम होणार आहे. याचा गांभीर्याने विचार करून स्वतंत्र फिडरद्वारे वीजपुरवठा करण्याची गरज आहे.
एक वेळ लाइट येऊन गेल्यानंतर दोन हजार रुपये नुकसान
प्लास्टिक इंडस्ट्री असल्याने ही सर्व हीटिंग प्रोसेस आहे. यामध्ये कमीत कमी एक वेळ लाइट येऊन गेल्यानंतर दोन हजार रुपये नुकसान होते. जितक्या वेळाही लाइट जाते, त्या बदल्यात मोफत युनिट वीज द्यावी. स्वतंत्र फिडरने वीजपुरवठा तत्काळ केला तरच उद्योग टिकणे शक्य होईल.- दत्तात्रय भुसे, पाइप उत्पादक
लवकरच याबाबतचा प्रश्न मार्गी लागणार
महावितरणचा स्वतंत्र फिडर असून ते ब्रह्मपुरीपर्यंत पाच सबस्टेशन या लाइनवर आहेत. त्यामुळे एका ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला की संपूर्ण लाइनच बंद ठेवावी लागते. औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र फिडर मंजूर असून, संबंधित ठेकेदाराने काम केले नाही. त्यामुळे दुसन्या ठेकेदाराला काम देण्यासंदर्भातील कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच याबाबतचा प्रश्न मार्गी लागणार आहे. – सचिन कोळेकर, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, महावितरण
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज