प्रेयसीसोबत विवाह करण्यासाठी नवविवाहित पत्नीचा खून करुन जबरी चोरीचा बनाव केला व चोरट्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर पतीनेच खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पती महेश भारत मिसाळ (रा. पुणे) यास येथील जिल्हा सत्र विशेष न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
मनिषा पिसाळ (रा. कोंबडवाडी, ता. उस्मानाबाद) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून 2 जानेवारी 2018 रोजी मनिषाचे वडील फुगारे यांनी पांगरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
ही घटना पाथरी तलावाजवळ घडली होती. मनिषाचा विवाह 7 मे 2017 रोजी महेश मिसाळ (रा.खामसवाडी, ता. उस्मानाबाद) याच्याशी झाला होता. मृत्यूसमयी ती चार महिन्यांची गरोदर होती. महेश हा पुण्यात कामास होता. त्यामुळे लग्नानंतर दोघेही पुण्यास रहावयास गेले.
लग्नानंतर काही दिवसांनी तिला आपला पती सतत एका महिलेशी फोनवर बोलत असल्याचे लक्षात आले. त्याबाबत मनिषाने आपल्या माहेरी कल्पना दिली होती. 2 जानेवारी 2018 रोजी अचानक सकाळी साडेदहाला महेश पत्नीसह सासुरवाडीला आला.
मात्र तेथे न थांबता तो लगेच पत्नीला घेवून बार्शी तालुक्यातील पाथरी येथील बहिणीकडे गेला. संध्याकाळी येतो म्हणून फोन आल्यानंतर काही वेळाने दोघांचेही फोन लागत नसल्याचे आढळून आले.
त्यामुळे आपल्या नातेवाईकांसह त्यांना शोधण्यासाठी निघाल्यानंतर रात्री येरमाळ्याजवळ चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत मनिषाचा मृत्यू झाल्याचे महेशने सांगितले.
पांगरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर महेश मिसाळ याने आपले प्रेमसंबध असून त्या महिलेशी विवाह करण्यासाठी मनिषाचा खून केल्याची कबूली दिली.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य तपास केल्याने व त्याचे प्रेमसंबध असल्याचे उघड झाल्याने न्यायालयाने महेश मिसाळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे ऍड. शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज