टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील एका वकिलाच्या मोटर सायकलच्या टाकीमधील १ हजार रुपये किमतीचे १० लिटर पेट्रोल चोरणाऱ्या
शाहरूख जावेद बागवान (वय १९ वर्षे ) व राहुल प्रविण माने ( वय १९ ) ( दोघेही रा.मंगळवेढा ) या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील फिर्यादी अॅड.रमेश जोशी हे रात्री ९ .०० वा. बुलेट क्रमांक एम.टी.एच ५९१७ ही गाडी घरासमोरील पत्रा शेडमध्ये लावली होती.
पहाटे २.०० च्या सुमारास फिर्यादीचा पुतण्या पुणे येथून घराजवळ आल्यानंतर तो गाडीतून खाली उतरल्यावर त्याला पेट्रोलचा वास आला.
यावेळी त्याने बुलेटजवळ जावून पाहिले असता पेट्रोलची पाईप काढून प्लास्टिकची बाटली लावलेली दिसली.
यावेळी फिर्यादी जोशी व त्यांचा पुतण्या यांनी आजूबाजूस शोध घेतला व घरासमोरील सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक केले असता दोन मुले पेट्रोल काढताना कॅमेरात कैद झाले होते.
याबाबत तात्काळ पोलिस निरिक्षक रणजित माने यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवून वरील दोघांना अटक करून न्यायालयात उभे केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान शहर परिसरात घरासमोरील रात्रीच्यावेळी लावलेल्या गाडयातील पेट्रोल पळविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र असून
मोटर सायकलस्वार किरकोळ घटना असल्याचे समजून पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नसल्याने अशा भुरट्या चोरट्यांचे फावत चालल्याचा बोलबाला या घटनेवरून नागरिकांमधून सुरु आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज