मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निखिल बिस्वास (वय ६८ रा. महिंद्रनगर करमाळा) असे संशयित आरोपी डॉक्टरचे नाव आहे.
याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन उत्तमराव गुंजकर (वय ४२ रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, निखील बिस्वास हा बोगस डॉक्टर असून तो ०१ जून २०१२ पासून करमाळा शहरातील जीन मैदानासमोरील गाळ्यात कमलाई क्लिनीक सुरू करून अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करत होता.
याची माहिती मिळताच पोलिसांनी आज कमलाई क्लिनीकमध्ये छापा टाकला. यावेळी कोणताही परवाना नसताना बिस्वास हा अवैद्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले.
यावेळी ऑपरेशनसाठी वापरण्यात येणारे साहित्य, विविध कंपन्यांची औषधे , गोळ्या, सलाईन, असे ९ हजार ९२१ रूपयांचे वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपी बिस्वास हा करमाळा शहरात दवाखाना चालविण्याचा परवाना नसताना खरा डॉक्टर असल्याची बतावणी करून रूग्णांवर औषधोपचार करीत होता. तसेच प्रिस्क्रिशन पॅड वर डॉ. एस. एच. महाजन, डॉ. श्रीमती एस. एस. महाजन यांची नावे टाकून त्यांची पुर्व परवानगी न घेता त्यांच्या नावाखाली दवाखाना चालवून रूग्णांची फसवणूक करीत होता.
याप्रकरणी त्याच्याविरूध्द सरकार तर्फे डाॅ गजानन गुजंकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या आदेशाने पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन जगदाळे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज