टीम मंगळवेढा टाईम्स ।
वाहन चालवण्याचा परवाना विमा व कागदपत्रे नसतानाही भरधाव बस चालवल्याने झालेल्या अपघातात शाळकरी मुलांना जखमी करून शिपायाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने चालकाला सहा महिने साधी कैद नऊ हजार १०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
नवनाथ भिकाजी ढगे असे शिक्षा ठोठावलेल्या चालकाचे नाव आहे. जुनोनी येथील जुनोनी माध्यमिक विद्यालय विद्यालयाची स्कूलबस (एम एच १४ बी ए ८०२४ ) दररोज विद्यार्थी वाहतूक करीत होती.
एक एप्रिल २०१७ रोजी विद्यार्थी आणण्यासाठी लमाणतांडा , मेटकरवाडी, खडकी येथे गेली होती. सकाळी ७.३० च्या सुमारास विद्यार्थी घेऊन जाताना खडकी जुनोनी रस्ता पार करून
नंदेश्वर, जुनोनी रस्त्यावर आल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याशेजारील खड्ड्यात उलटली.
अपघात होणार हे लक्षात आल्यावर मुलांच्या सुरक्षेसाठी असलेला शिपाई अण्णासाहेब कृष्णा जाधव (वय ४०) याने त्यातून उडी घेतली.
दुर्दैवाने बस डाव्या बाजूला त्याच्या अंगावरच उलटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी ४५ जणांना येथे उपचारासाठी दाखल केले होते.
त्यापैकी गंभीर जखमी ११ जणांना सोलापूरच्या शासकीय रुग्ण्यालयात हलविले होते.
याप्रकरणी पालक किसनसिंग गुलाबसिंग रजपूत (रा.खडकी) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरुन चालक नवनाथ ढगे याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी त्याला अटक केली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयात सुनावणी झाली.
गुन्ह्याचे स्वरुप , पुराव्यावरुन शिक्षा
अण्णासाहेब जाधव हे त्यांच्या घरातील एकमेव कर्ते पुरुष होते. तसेच अपघातात शालेय विद्यार्थीही जखमी झाले. त्यांना अपंगत्व आले. त्यामुळे आरोपीस जास्त शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील धनंजय बनसोडे यांनी न्यायालयात केली.
गुन्ह्याचे स्वरूप, दाखल झालेला पुरावा, या सर्व गोष्टीचा विचार करून प्रथमवर्ग न्यायाधीश जी.एम. चरणकर यांनी सहा महिने साधी कैद व ९ हजार १०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.(स्रोत:दिव्य मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज