टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याला सन २०२२-२३ या चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला २३०० रुपये प्रतिटन प्रमाणे पहिला हप्ता देण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिली.
मोहोळ तालुक्यातील दोन कारखान्यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या उचलीपैकी जकराया कारखान्याची पहिली उचल उच्चांकी ठरली आहे.
यंदा ऊस गाळपाचा हंगाम जिल्ह्यात मोठ्या जोमात सुरू आहे. जिल्ह्यातील जवळपास साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने यंदाचा गळीत हंगाम जास्त दिवस चालणार नसल्याचे चित्र आहे.
सर्वच कारखान्यांना यंदा उसाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याच कारखान्याला ऊस घालावा यासाठी कारखान्याच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून विविध कारखान्यांनी आपापल्या हप्त्याची घोषणा केली आहे. काही अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी आपला पहिला हप्ता २२०० रुपयांप्रमाणे जाहीर केला आहे.
त्या तुलनेत जकाराया कारखान्याने जाहिर केलेला पहिला हप्ता कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी बरा आहे.
इतर कारखान्यांची ऊस दराची स्थिती मोहोळ तालुक्यात भीमा, लोकनेते बाबूराव पाटील आणि जकराया हे तीन कारखाने कार्यरत आहेत.
भीमा कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा २२०० रुपये पहिला हप्ता आणि २६०० रुपये अंतिम दर देण्याची घोषणा करून ऊस दराची कोंडी फोडण्यात पुढाकार घेतला होता.
भीमा कारखाण्याच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्यानेही पहिली उचल २२०० रुपये देण्याची घोषणा केली.
जकराया साखर कारखान्याने मात्र भीमा आणि लोकनेते कारखान्याच्या एक पाऊल पुढे टाकत आपला पहिला हप्ता २३०० रुपयांप्रमाणे जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
२३०० रुपयांप्रमाणे बिले लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील अशी माहिती जकाराया कारखान्याचे एमडी सचिन जाधव यांनी दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज