टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविकांचे असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया व बिरोबा (गुरू) पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात पार संपन्न झाला आहे.
लाखो भाविकांनी महालिंगराया -बिरोबाच्या नावानं चांगभलं या गजरात मुक्तहस्ताने भंडारा ,खारीक व लोकरची उधळण केली . मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी भेट सोहळा आयोजित उत्साहात संपन्न झाला.
गेल्या आठवड्याभरापासून हा ऐतिहासिक सोहळा सुरू आहे. दररोज लाखोच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र हुलजंती येथे दाखल झाले होते. काल सोमवारी पहाटेपासून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंडासचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
जगातील एकमेव ठिकाण स्वर्गातून शंकर-पार्वती महालिंगरायाच्या मंदिराला पंच शिखराला मुंडास (आहेर) बांधले जाते. हे मुंडास मध्यरात्री शंकर व पार्वती यांच्या कृपने होते. अशी अख्यायिका आहे. या मुंडासचे (ध्वज) दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोच्या संख्येने दाखल होतात.
अमावस्येच्या रात्री शिवपार्वती येथे भूकैलास हुलजंती होई जन्माला येऊन एकदा मुंडास पाही याचं उक्तीप्रमाणे भाविक मोठ्या भक्ती भावाने दिवसभर दर्शन घेत होते.
तसेच (गुरु) बिरोबा -महालिंगराया( शिष्य )यांच्या पालखी भेट सोहळ्यासाठी नयनरम्य दर्शनासाठी मंदिराच्या बाजूने वाहत असलेल्या ओढ्यात लाखो भाविकांची गर्दी झाली होती.
यावेळी ढोल कैताळ नगाराच्या गजारात आकाशात भंडारा व लोकरची उधळण करत बिरोबा महालिंगरायाच्या नावानं चांगभले या जयघोषात पालखी भेट सोहळा पार पडला. दरम्यान यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मठ व धार्मिक व्यक्तीने दासोह प्रसादाची सोय केलेली होती.भाविकांनी याचा लाभ घेतला.
या गुरू शिष्याच्या नयनरम्य भेट सोहळ्या अगोदर सात पालख्यांचा भेटीचा मान आहे. सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव, चडचण येथील शिरडोन येथील बिरोबा यासह अन्य देवाच्या पालख्यांचा भेट सोहळा होतो.
एक महान चरित्र,विर सिद्धपुरुष नायक मराठी भुमीमध्ये जन्म घेऊन सर्व भाषेच्या सीमा पार करून कन्नड मराठी, तेलगू लोकांच्या मनावर आजतागायत निर्विवाद अधिराज्य गाजवतो. याची अनुभूती या यात्रेत गेल्यानंतर मिळते. महालिंगरायाच्या भक्तीचा महिमा डंका महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात आहे.
अशी भाकणुक वर्तवली
सात पालख्यांचा भेट सोहळा झाल्यानंतर पुजाऱ्यांनी भाकणूक वर्तवली. ज्वारी एक नंबर असेल. ज्याच्याकडे बैल असेल तो श्रीमंत ज्याच्याकडे गाई असेल तो पालखीत बसेल. उत्तर दिशेला ठाबठूब असेल. बन फुटेपर्यंत पाऊस असणार आहे. जत्रा फुटेपर्यंत पाऊस एक सरी होईल. अशी पुजाऱ्यांनी भविष्यवाणी (भाकणुक) वर्तवली.
यावेळी लाखो भाविकांनी श्री महालिंगरायाच्या नावानं चांगभलं चा गजर व लोकर, खारीक, खोबर भंडाऱ्याची उधळण भक्तीभावाने केली. या भाकणुकीला विशेष महत्व असते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज