टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात अवैध सावकारीने धुमाकूळ घातला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरजू लोकांची मनमानी लूट सुरू आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्यांसारख्या घटना घडत आहेत.
सावकारांना कायद्याचा धाक वाटत नसल्याने त्यांचे धाडस वाढत चालले आहे. मार्च अखेरमुळे तर सावकार वसुलीसाठी दमदाटी, मारहाण करत असल्याच्या घटना घडत आहेत.
अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कमी भांडवलात भरमसाठ रक्कम उकळता येत असल्याने असे गल्लीबोळात सावकार तयार झाले आहेत. दरमहा १५ ते २५ टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली करून कर्जदारांना भिकारी करण्याचा उद्योग सुरू आहे.
सावकारीचा धंदा करणारे काहीजण व्याजापोटी आधीच कोऱ्या धनादेशावर सह्या किंवा जमीन, घरे, वाहने लिहून घेतात. ठराविक कालावधीचा शेत, जमिनी याबाबत दोघांमध्ये करार केला जातो. व्याजाची रक्कम थकल्यास सावकारांकडून शिवीगाळ केली जाते.
संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जातात. ठरलेल्या वेळेत पैसे आले नाहीत तर ती जमीन, शेती स्वतःच्या नावावर करून घेतली जाते. अवैध सावकारीतून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. कर्जाच्या वसुलीसाठी दमदाटी करणे, घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
जोपर्यंत तारण ठेवलेली वस्तू मिळत नाही, तोपर्यंत सावकाराचे व्याज थांबतच नाही. कर्जाचे हप्ते न दिल्यास संबंधित कर्जदारास अतिशय वाईट वागणूक दिली जाते. त्यामुळे कर्जदार भीतीपोटी सावकार म्हणेल तसे, सांगेल तसे निमूटपणे सर्व काही सहन करतात.
भीतीपोटी तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही. अलीकडे सर्वच क्षेत्रांत सावकारी बोकाळली आहे. शेतकरी, रिक्षाचालक, व्यापारी, भाजी विक्रेते, कामगार, मजूर, मटका खेळणारे, व्यसनाधीन लोक सावकारांच्या फासात अडकत चालले आहेत.
सध्या काहीही कामधंदा न करता अनेकजण सावकारीच्या जोरावर करोडपती झाले आहेत. गळ्यात सोनसाखळी, हातात सोन्याचे कडे अशा थाटात फिरणाऱ्यांनी फ्लॅट, शेती, बंगले, गाडी अशा अनेक ठिकाणी संपत्तीची गुंतवणूक केली आहे. या अवैध संपत्तीची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अनेक पतसंस्था, बँकांना कर्जासाठी द्यावी लागणारे कागदपत्रे नसतात. राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका कर्ज देताना पगाराची स्लिप अथवा आयटी रिटर्न भरलेली कागदपत्रे असल्याशिवाय रक्कम मंजूर करत नाहीत.
बहुसंख्य सामान्य लोकांकडे या दोन्ही गोष्टी नसतात. केवळ तारणावर बँक अथवा पतसंस्था कर्ज देत नाही. त्यामुळे गरजेच्यावेळी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची वेळ येते. याचा गैरफायदा घेत सावकार लूट करत आहेत.
भिशीमार्फत चालते सावकारी
मंडळे, काही बचतगट यांच्यामार्फत भिशी चालवली जाते. त्यापैकी काही भिशींतून आठवड्यावर पैसे दिले जातात. त्याची आकारणी १५ ते २५ टक्के असल्याचे बोलले जाते. एखाद्या आठवड्यात हप्ता चुकला तर चक्रवाढ व्याज लावण्यात येते.
जर मूळ रक्कम १५ हजार असेल तर चार ते पाच हप्ते थकले तर ती रक्कम ६० ते ७० हजारांच्या घरात जाते. काही दुकानांतही अवैध सावकारी चालते. येथे दागिने गहाण ठेवून लोकांना कर्ज दिले जाते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज