टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अक्कलकोटमधील एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
माझा दोन वेळा पराभव झाला आहे. तरीही प्रणितीताई शिंदेला आणि मला भाजपची ऑफर आहे, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.
या वक्तव्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. सुशीलकुमार शिंदे यावर बोलताना म्हणाले, भाजपची ऑफर आहे, पण आता ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीत वाढलो. जिथे आमचं बालपण आणि तारुण्य गेलं.
त्याला कसं विसरायचं? आता मी 83 वर्षांचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं म्हणणं बरोबर आहे असं कसं म्हणणार? तुम्हाला हेही माहिती आहे की, प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
शिंदे काय म्हणाले?
सोलापूरमध्ये हुर्डा पार्टीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केला होता. आता मी ८३ वर्षांचा आहे. त्यामुळे आता दुसऱ्याचे घर उभे करण्याचे काम करणार नाही. ज्या आईच्या कुशीत बालपण गेले अशावेळी आता दुसरीकडे जाणार नाही.
प्रणिती शिंदे तर कधी पक्ष बदलण्याचा विचार करणार नाहीत. सध्या पक्षाला वाईट दिवस आले असतील पण आपण पुन्हा नव्याने उभे राहू असं ते म्हणाले होते.
भाजपने काय म्हटलं?
भाजपने ऑफर दिल्याची बातमी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळली आहे. आमचे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे कौटुंबिक संबंध आहेत. पण, आम्ही सुशीलकुमार शिंदेंना ऑफर दिलेली नाही. त्यामुळे चर्चेत असलेल्या बातम्या खोट्या आहेत, असं ते म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज