मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील कासारवाडी रस्त्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी छापा टाकला.
या प्रकरणी चार महिलांसह आठ जणांविरोधात बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.
दरम्यान, या प्रकरणी तिघांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गायत्री एस. पाटील यांनी संशयित आरोपींना २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त शितोळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. सुषमा किशोर गायकवाड (वय ४०, परिचारिका, रा. ताडसौंदणे रोड),
उमा बाबूराव सरवदे (वय ५०, आया, रा. हिरेमठ हॉस्पिटल), राहुल थोरात (रा. बार्शी, औषध पुरवठादार),
नंदा गायकवाड (रा. बार्शी), दादा सुर्वे (रा. कुर्डुवाडी), सोनू भोसले (रा. शेटफळ), सुनीता जाधव (रा. बार्शी), सोनोग्राफी करणारा डॉक्टर, अशी इतर गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील सुषमा गायकवाड, उमा सरवदे, राहुल थोरात यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
कासारवाडी रस्त्यावरील भोईटे कन्स्ट्रक्शन अपार्टमेंटमध्ये सोनल चौरे यांच्या घरामध्ये गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी, उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड, हवालदार श्रीमंत खराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चारूदत्त शितोळे, दोन पंच यांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी ग्रामीण भागातील एक महिला तेथे आली होती.
तिला गर्भपाताची औषधे देण्यात आली होती. मात्र तिला खूप त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी १०८ रुग्णवाहिका बोलावून तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथेच तिचा काही वेळातच गर्भपात झाला. स्त्री जातीच्या भ्रूणाचा गर्भपातानंतर मृत्यू झाला असून त्या महिलेला सोलापूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात औषधे, किट एकजण गर्भपात करणाऱ्या महिलांना देत होता तर बाकीचे सर्वजण त्यांच्याकडे महिलांना गर्भपात करण्यासाठी पाठवत होते. सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरने गर्भ हा मुलाचा आहे की मुलीचा आहे, हे सांगून आतापर्यंत ३२ गर्भपात केले आहेत.
पोलिस पथकाने टाकलेल्या छाप्यात सर्व औषधी, गोळ्या, किट असा ६ हजार १०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी बेकायदेशीर गर्भपात केंद्र, प्रसूतिपूर्व निदान करण्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याबाबत पोलिस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड
तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज