टीम मंगळवेढा टाईम्स ।
दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून दोघांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे घडल्याने परिसर हादरुन गेला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते 6 वाजताच्या सुमारास फोंडशिरस येथील फारेस्ट शेजारील महादेव मंदिराजवळ हा प्रकार घडला.
किरकोळ वादातून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत होऊन यात तीक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यात दहिगावातील दोघांचा खून करण्यात आला आहे.
यातील मारेकरी फरार असून नातेपुते पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, किरकोळ वादातून होणाऱ्या खूनाच्या घटनांनी समाजमन हादरुन गेलंय. माणूस नेमकं काय साध्य करतोय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
संबंधित घटनेबाबत नातेपुते पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी नातेपुते येथील एका बिअर बार परमिट रुममध्ये आरोपी अक्षय बोडरे (रा.फोंडशिरस) व त्याचा दाजी, या दोघांनी नारायण विठ्ठल जाधव (रा.चिकणे वस्ती दहिगाव ता.माळशिरस) यास किरकोळ गोष्टीवरून शिवीगाळ करुन मारहाण केली.
बारमध्ये घडलेल्या या घटनेचा जाब विचारण्यास फिर्यादीसह नारायण विठ्ठल जाधव, दुर्योधन नवनाथ निकम, बाळू कुंडलिक जाधव, विनोद पोपट गोरे सर्व (रा.चिकणे वस्ती दहिगाव ता.माळशिरस) हे सायंकाळी नातेपुते ते फोंडशिरस जाणाऱ्या रोडवरील बनात असलेल्या महादेव मंदिराजवळ गेले होते.
याठिकाणी आरोपी अक्षय बोडरे, त्याचा दाजी व काही अनोळखी मुलांना एकत्र बोलावून अक्षय बोडरे खोटी माहिती दिली. आम्हालाच या सर्वांनी मारहाण केल्याचं अक्षयने सांगितले होते. त्यामुळे, अक्षय व त्याच्यासोबतच्या अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळी धमकी दमदाटी करून विटा मारुन जखमी केले.
अनोळखी मुलांपैकी एकाने अक्षय बोडरे यास चाकूसारखे धारदार हत्यार दिले. त्यानंतर त्या हत्यारानेच अक्षय बोडरेने नारायण विठ्ठल जाधव (वय 42) व दुर्योधन नवनाथ निकम (वय 22) यांच्या पोटात तीक्ष्ण हत्यार काढून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खूपसले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर मृत दोघांचेही पार्थिव नातेपुते येथील सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टम करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दारूच्या नशेत झालेल्याा घटनेने परीसर हादरून गेला आहे. संबंधित घटना व तक्रारीवरून नातेपुते पोलीस ठाणे येथे भादवि कलम 302,323,324,504,506,143,147,148,149 सह बीपी ॲक्ट 1350अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटननास्थळी भेटी देऊन फरार आरोपीच्या शोधकामी एकूण 3 पोलीस पथके तयार केली आहेत. या पथकांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनी महारुद्र परजणे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज