टीम मंगळवेढा टाईम्स।
हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र तसंच झारखंड विधानसभा निवडणुका कधी होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपसह काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसत आहेत.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक कधी होणार? तसंच निवडणुका किती टप्प्यात होणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा याच आठवड्यात होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये एक किंवा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होऊ सकते, पण एकाच टप्प्यात निवडणूक घ्यावी,
यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. याआधी महाराष्ट्रामध्ये दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका व्हायच्या. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे.
दुसरीकडे झारखंडमध्ये दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होतील. सुरक्षेची कोणतीही कमी नाही, तसंच झारखंडमधली परिस्थितीही सामान्य आहे, त्यामुळे झारखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी दिली आहे. दिवाळी आणि छट लक्षात घेऊनच निवडणूक आयोग तारखा निश्चित करेल, असंही निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप नेते दिल्लीत
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते उद्या दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज भाजपची दिल्लीत महत्त्वाची बैठक आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीसंदर्भात चर्चा होणार आहे,
त्यानंतर हीच यादी दिल्लीच्या नेतृत्वापुढेही ठेवली जाणार आहे. आचारसंहिता जाहीर होताच भाजपची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कधी होणार विधानसभा निवडणुकांची घोषणा? शरद पवारांनी वार अन् तारीखही सांगितली!
या आठवडाभरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. शुक्रवारी आचारसंहिता लागू होईल, असं ते म्हणालेत
भारतीय जनता पक्षाचे नेते, तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
चरण वाघमारे हे विधानसभा लढण्यास इच्छुक असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार राजू कारेमोरे यांच्या विरोधात त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. या कार्यक्रमावेळी बोलताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांवरुन महत्वाचे विधान केले तसेच यावेळी भाजपवरही जोरदार निशाणा साधला.
“भाजपचा जन्म होण्यापूर्वी जनसंघ महत्त्वाचा पक्ष होता. त्या जनसंघाची वाढ भंडारा गोंदिया जिल्ह्यातून झाली होती. अनेक राजकीय लोक तिथून निवडून येत होते. या जिल्ह्यात वेगळी विचारधरा होती सामान्य लोकांची प्रश्र्न मांडणारी होता.
आजचा भाजप आणि आधीचा भाजप यात मोठा फरक होता. राज्यात मागच्या २ महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील ८० टक्के लोक हे भाजपमधून आहेत. अस का होत आहे तर त्याच कारण असं होतं की शिस्त राहिली नाही. असं भाजपचे एक नेते जे माझे मित्र आहेत ते सांगत होते,” असे शरद पवार म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज