टीम मंगळवेढा टाईम्स ।
गावप्रमुखांनो विकास कामांच्या पाठपुराव्याला कमी पडू नका, मी विकास करायला निधी कमी पडू देणार नाही. मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही अशी ग्वाही पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
त्याचबरोबर तामदर्डी येथील भिमा नदीवरील बंधारा बांधणीचे काम लवकरच सुरु होणार असल्याचेही आ आवताडे यांनी सांगितले आहे.
सदर बंधाऱ्याअभावी गेली अनेक वर्षे या भागातील माचणूर, तामदर्डी, अरळी, बोराळे, सिद्धापूर, तांडोर, अरबळी, बेगमपूर, मुंढेवाडी या गावांतील व या नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी पावसाळ्यामध्ये पाणी अडविण्यासाठी लोकवर्गणी च्या सहाय्याने मातीचे बांध घालतात.
परंतु पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह आल्यानंतर घातलेल्या या बंधाऱ्याची माती वाहून जाते. आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन उभी पिके जगविणे जिकरीचे होते.
या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर आ आवताडे यांच्या अथक परिश्रमातून या बंधाऱ्याचे सर्वेक्षण होऊन येत्या १५ दिवसांत याचे अंदाजपत्रक जलसंधारण महामंडळाकडे
सादर केले जाणार असल्याचे जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दामा यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आ.आवताडे यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे या बंधाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
आमदार आपल्या दारी या अभियाना द्वारे आमदार आवताडे यांनी तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्याच्या अनुषंगाने या गावांना माचणूर, ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर, बोराळे,
अरळी, नंदूर, डोणज, भालेवाडी या गावांना भेटी देऊन स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांच्या अडी अडचणी तसेच विविध समस्या जाणून घेत असताना आ आवताडे बोलत होते.
या दौऱ्यामध्ये जनतेच्या वीज, रस्ता, पाणी आदी प्रश्नांवर आ आवताडे तोडगा काढत असताना तांडोर येथील बिराजदार डी. पी. शासकीय अनुदानातून निधी मंजूर असतानासुद्धा खाजगी रूपामध्ये पैसे घेतल्याचे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी आ आवताडे यांच्या कानावर घातल्यावर हे पैसे घेणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश आ.आवताडे यांनी महावितरण विभागाला दिले आहेत.
त्याचबरोबर यापुढील काळामध्ये असे प्रकार घडता कामा नये जर असे कोणी असे प्रकार करुन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा सज्जड दम आमदार आवताडे यांनी दिला आहे.
उजनी कालवा निर्मितीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित झाल्या आहेत अशा अनेक शेतकऱ्यांचा मोबदला आपणास अद्यापपर्यंत मिळाला नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. यावर आ.आवताडे यांनी प्रांताधिकारी बी. आर. माळी यांना
शुक्रवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रांताधिकारी दालनामध्ये तहसीलदार, भूमी अभिलेख, उजनी कालवा संबंधित अधिकारी व पदाधिकारी आणि लाभार्थी शेतकरी यांची बैठक घेऊन योग्य तो सकारात्मक तोडगा काढून शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.
खरीप हंगामातील पावसाने दडी दिल्याने सध्या मंगळवेढा तालुक्यामध्ये खरीप पेरणीची पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर शेवटच्या घटका मोजत आहेत. या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये निर्माण झालेल्या पाणीप्रश्न, चारा, रोजगार व इतर समस्यांचा निपटारा करण्यासाठी आ आवताडे यांनी शुक्रवार पासून गावभेट दौरा हा कार्यक्रम हाती घेतला आहे.
आमदार आवताडे हे सदर दौऱ्यादरम्यान तालुक्याच्या विविध गावातील जनतेची लेखी व तोंडी मागण्यांची निवेदने स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यामार्फत जनतेच्या अडचणी दूर करत आहेत.
आ.आवताडे यांच्या माध्यमातून व प्रयत्नांतून तसेच इतर शासकीय योजनेतून तालुक्यातील गावांमध्ये निधीच्या रूपाने मंजूर असलेल्या व पूर्ण झालेल्या विकासकामांचाही आ आवताडे यांनी ग्रामस्थांकडून आढावा घेतला.
त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विकास कामांच्या जास्तीत-जास्त योजना मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही आ आवताडे यांनी सांगितले आहे.
या दौऱ्यासाठी प्रांताधिकारी बी. आर माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दामा, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कोष्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिंदे, पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे,
ए. आर. दुर्गुडे, बाल प्रकल्प अधिकारी गारोळे, लघु पाटबंधारे विभाग पारवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जानकर, पुरवठा विभागाचे पाटील, वन विभागाच्या वाघ, आठवले शासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज