टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहराजवळील एका मंगलकार्यालयात 17 वर्षीय अल्पवयीन मुली बरोबर 25 वर्षे वयाच्या मुलाबरोबर साखरपुड्यात होणारा बालविवाह मंगळवेढा पोलीसांच्या सतर्कतेमुळे टळला असून
फेसबुक, व्हॉटसअपचा जमाना असतानाही मंगळवेढ्यातील बालविवाहाची मालिका… संपता… संपेना. परिणामी पालकांना आत्मचिंतन करण्याची आली वेळ.
या घटनेची हकीकत अशी की, मंगळवेढा शहरालगत असलेल्या बायपास रोडवर जोगेश्वरी मंगलकार्यालयात दि.13 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता साखरपुडा कार्यक्रमात बालविवाह होणार असल्याची गुप्त माहिती
डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना मिळताच त्यांनी शहर बीटचे पोलीस हवालदार हजरत पठाण, महिला पोलीस नाईक सुनिता चवरे, पोलीस नाईक कविता सावंत, पोलीस शिपाई अतुल खराडे, अमोल राऊत,शिवाजी काळे यांची
टीम सदर ठिकाणी पाठवून शहनिशा केली असता हळदीच्या कार्यक्रमात रेड्डे येथील शिक्षण घेणारी 17 वर्षीय मुलगी तर लेंडवेचिंचाळे येथील 25 वर्षीय मुलगा एका हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेल्या मुला बरोबर बालविवाह करण्याची तयारी सुुरु असतानाच
पोलीसाचे पथक अचानक धडकल्याने खाकी वर्दीतील पोलीस पाहून दोन्ही वधू व वराकडील मंडळींना घाम फुटला.
पोलीस पथकाने संपूर्ण चौकशी करुन वधू व वरासहीत आई-वडीलांना मंगळवेढा पोलीस ठाण्यात आणून त्यांचे समुपदेशन करुन मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे झाल्याशिवाय विवाह करणार नसल्याची मानसकिता तयार केली गेली.
यावेळी महिला दक्षता कमिटीच्या अध्यक्षा शुभांगी सुर्यवंशी या उपस्थित होत्या. समुपदेशन केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीस सोलापूर येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.
सध्या फेसबुक, व्हॉटसअपचा जमाना आहे. तसेच भारत देश अमृत महोत्सव साजरा करीत असताना अद्यापही मंगळवेढा सारख्या शहर व परिसरात अनेक बालविवाह यापुर्वी रोखले असून बालविवाहाची मालिका संपता संपेना अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
परिणामी मुला-मुलीचे आई-वडील वयाच्या 18 व 21 वर्षाचा गांभीर्यपुर्वक विचार न करता केवळ डोक्यावरील ओझं कमी करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवत असल्याने आजही बालविवाह करण्याची प्रथा प्रगतीकडे वाटचाल करणार्या राज्यात दिसून येत असल्याने पालकवर्गावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
बालविवाह रोखण्याची सर्व जबाबदारी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर असतानाही त्यांची मानसिकता मात्र बालविवाह रोखण्याची दिसून येत नाही. मागील दोन आठवड्यापुर्वी गुंजेगाव येथील बालविवाह झाल्याच्या तक्रारी सुज्ञ नागरिकांनी पोलीसांकडे केल्या होत्या.
ग्रामसेवकांनी जबाबदारी झटकून मला काहीच माहीत नाही असे म्हणून त्यातून अंग काढून घेण्याचा प्रकार घडला होता. जिल्हाधिकारी मिलींद शभरकर यांनी गांभीर्यपुर्वक लक्ष घालून गावपातळीवरील बालविवाह जे रोखणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचे हत्यार उपसावे अशी मागणी आता सुज्ञ जनतेमधून पुढे येवू लागली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज