टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातून जनजागृती करीत लोकांना कोरोना विषयी जागृत करणारे मंगळवेढ्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ.शरद वसंत शिर्के आणि त्यांच्या पत्नी डॉ.सौ.प्रीती शिर्के हे दाम्पत्य कोरोनाबाधित झाले होते.
वेळेवर उपचार घेत त्यातून बरे झाल्यावर त्यांनी पुन्हा जनजागृतीच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. डॉ. शिर्के यांचे जनजागृतीचे कार्य फक्त मंगळवेढा तालुक्यापुरते मर्यादित नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह ६ जिल्ह्यांमधून ऑनलाईन कॉन्फरन्स सुविधेद्वारे हे कार्य अविरत सुरू आहे.
मंगळवेढ्यातील डॉक्टर शिर्के दाम्पत्य#DoctorsDay2021 pic.twitter.com/qllKCuBX4w
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) July 1, 2021
मंगळवेढ्यात वैद्यकीय सेवेत रममाण झालेले डॉ.शरद शिर्के हे सैनिक कुटुंबातून हे असलेले डॉ.शरद शिर्के यांच्या पत्नी डॉ.सौ.प्रीती ह्या देखील एमडी (आयुर्वेद) आहेत.
डॉ.शरद शिर्के यांना एक विवाहित बंधू असून ते पुण्यात स्थायिक आहेत. डॉ.शरद आणि डॉ.सौ.प्रीती यांना ओमसाई हा मुलगा आहे. डॉ.शरद शिर्के यांनी मंगळावेढ्यात हॉस्पिटल सुरू करण्याआधी १७ वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवा बजावली आहे.
सेवेत असतानाच शासकीय उपक्रम राबवतानाच त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली. त्यावेळेपासून मोफत आरोग्य शिबिरे घेणे, मोफत नेत्र तपासणी, रक्तदान शिबिरे घेणे या उपक्रमांचे आयोजन ते करू लागले.
गेल्या २६ वर्षांपासून सामाजिक कार्याशी जोडलेल्या डॉ.शरद शिर्के यांचा ग्रामीण जनजीवन आणि आरोग्य या विषयावर प्रचंड अभ्यास आहे. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पाठीशी पत्नी डॉ.सौ. प्रीती शिर्के खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.
कोरोना महामारीच्या काळात पहिल्या टप्प्यापासून डॉ.शरद शिर्के यांनी समाज प्रबोधन करायला सुरुवात केली. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून ६ जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन कॉन्फरन्स घेवून बचत गटांना कोविड या संसर्गजन्य साथी विषयी मार्गदर्शन केले.
शाळा, कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी वर्ग, पोलीस कर्मचारी आदींना ५ हजार ग्लुकोज डी आणि सॅनिटायजरचे वाटप केले. प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा स्वयंसेविका, छोटे व्यापारी , शिक्षक , विद्यार्थ्यांना ७ हजार ५०० मास्कचे न वाटप केले.
शंभर गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले. ‘बी पॉझिटिव्ह’ या सदराखाली वृत्तपत्रांमधून सामाजिक प्रबोधन केले. कोरोनाशी दोन हात कसे करावेत? धैर्याने कसे तोंड द्यावे, डिप्रेशनमध्ये न जाता कसा मुकाबला करावा? याविषयी शास्त्रीय माहिती दिली.
शिर्के मॅटर्निटी होम मध्ये मोफत रॅपिड अँटीजन टेस्ट केल्या. कोरोनाकाळात एच आर सिटी टेस्ट अल्पदरात सिटीस्कॅनची सोय उपलब्ध करून दिली. हे काम करीत की असताना डॉ.शरद शिर्के यांना अनंत अडचणी आल्या.
परंतु अडचणींवर मात करत डॉ. शिर्के यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले. याकामात त्यांना प्रशासकीय यंत्रणेचे चांगले सहकार्य मिळाले. ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव असल्याने अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असते. यातून बऱ्याच ग्रामस्थांनी डॉ.शरद शिर्के यांच्याशी असलेला संपर्क तोडला.
तर हॉस्पिटल मधील ९० टक्के स्टाफ पळून गेला. घरात काम करणारे नोकर देखील गैरहजर राहू लागले. या अडचणींतून मार्ग काढतच डॉ. शिर्के यांचे समाज प्रबोधन सुरू आहे.
सामाजिक कार्य करीत असतानाच डॉ. शरद शिर्के आणि त्यांच्या पत्नी डॉ. सौ. प्रीती शिर्के यांना कोरोना बाधा झाली होती. डॉ. शरद तर २२ दिवस सोलापुरातील त्यांचे मित्र डॉ. नितीन तोष्णीवाल यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होते.
अतिशय अत्यवस्थ अवस्थेत ते आठ दिवस व्हेंटिलेटरवर होते. पण त्यांनी खंबीरपणे कोरोनावर मात केली आणि परत काम सुरू केले .
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण सध्या सामना करत आहोत. या आठवड्यात केसेस जरा कमी झाल्यात असं दिसतंय. पण पहिल्या लाटेच्या तुलनेत ही दुसरी लाट जास्त जलद गतीनं पसरताना आपण पाहीली. आणि मृत्यूचा आकडाही प्रचंड वाढला.
विशेष म्हणजे 30 ते 50 या वयोगटातील तरुणांना ही दुसरी लाट जास्त जीवघेणी ठरलीय. त्यामुळे समाजात जबरदस्त भीती , अस्वस्थता , आणि नैराश्य पसरलंय . व्यक्त न करता येणारी जीवघेणी घुसमट जवळ जवळ प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येक व्यक्ती अनुभवतेय.
प्रत्येकाच्या घरातला, नात्यातला , मैत्रीतला किंवा माहितीतला जवळचा , प्रेमाचा व्यक्ती या लाटेनं हिरावून घेतलाय. काही ठिकाणी आई वडील दोघेही आपल्या लहान मुलांना अनाथ करून निघून गेलेत. कित्येक कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झालीत. हे सगळं खूप विदारक , आणि शाब्दिक सांत्वनाच्या , समुपदेशनाच्या पलीकडचं आहे.
असं असलं तरी काहींनी खूप धीरोदात्तपणे आपल्या मनाच्या बळावर सकारात्मक राहून मनाचा तोल ढळू न देता खंबीरपणे कोरोनावर मातही केली ज्यानं समाज सेवेत स्वतःला अखंडपणे झोकून दिलंय त्या डॉ . शरद शिर्के यांचं घेईन. डॉ . शरद शिर्के यांना गेले कित्येक वर्ष मधुमेहाचा त्रास असून त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती.
त्यांना त्यांच्या पत्नीनं दिलेल्या मूत्रपिंडावर जीवदान मिळालं आहे. त्या मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रियेनंतर त्यांना त्यांच्या शरीरात आधीच खूप साऱ्या स्टिरॉइड प्रकारात मोडणाऱ्या औषधांचा भडीमार झाला आहे. खूप सारी खाण्यापिण्याची पथ्ये त्यांना पाळावी लागतात.
वातावरणातील किरकोळ बदलही गांभीर्यानं लक्षात घेऊन त्यांना रोजच जीवन जगावं लागतं . इतकी नाजूक परिस्थिती असताना स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळं किंवा सामाजिक कार्याची ओढ असल्यामुळं कुठंतरी कोरोनाचा संसर्ग झाला. जीवनाविषयीची ठासून भरलेली ऊर्जा , आपल्या सभोवतालच्या माणसांचं जगणं सुखाचं आणि सुंदर करण्याची त्याच्या मनातली धगधगती ओढ तसंच स्वतःमध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वास , आयुष्याकडं बघण्याची सकारत्मक दृष्टी या सगळ्यांच्या बळावर त्यांनी कोरोनावर मात केली.
अशी अजूनही उदाहरणं असतील . हे का उदाहरण देतोय याचं कारण की आपल्या मनाची शक्ती आपल्याला कुठल्याही जीवघेण्या प्रसंगातून अथवा आजारातून बाहेर काढायला नक्कीच मदत करत असते हे शास्त्रीय संशोधनातूनही सिद्ध झालंय . आणखी एक मुद्दा.
या कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मुळे ओढवलेली आर्थिक कोंडी , जगण्याची कुत्तरओढ हे देखील समाज अनुभवतोय . याला आता एक वर्ष होऊन गेलं. कित्येकांनी आत्महत्या केल्या. कित्येक जण कर्जाचे हप्ते कसे फेडायचे या विवंचनेत अडकलेत . असुरक्षीत आणि कमालीचं अधांतरी आयुष्य आपण जगतोय.
पण लोकहो अंधार कितीही काळाकुट्ट असला तरी त्यालाही पहाटेची आणि उजाडणाऱ्या सूर्याची जाणीव आणि भीती असतेच. त्यांची चाहूल लागताच या अंधाराला आपला बाडबिस्तारा गुंडाळावाच लागतो. अगदी तसंच होणार या कोरोनाच्या काळ्याकुट्ट अंधाराचं. आणि ते होताना दिसतंय.
आता पहाट होताना दिसतेय. रुग्णाची रोजची आकडेवारी कमी होताना दिसतेय.तेव्हा घाबरू नका. नक्की उजाडेल. जे गेलेत त्यांना नाही आणता येत परत. सृष्टीचा नियमही आपण समजूनघेऊ यात . आता ऊरलेल्यानी छान माणूस म्हणून जगायचं , माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करायचं.
एकमेकांवर खूप प्रेम करायचं. खूप जीव लावायचा. सर्वांनी सर्वांची जपणूक करायची. मनात शास्त्रीय दृष्टिकोन रुजवायचा आणि रोजच्या जगण्यात तो अमलात आणायचा. भांबावून जायच नाही . गर्दीत हरवायचं नाही. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा म्हणतं स्वतःचा रंग एकांत स्थळी अनुभवायचा आता मनातली भीती संपवू या.
निराशा झटकून टाकू या, जरा स्थीर होऊ या. विसावूया . आणि याच वळणावरून मागं आपल्या जीवनाकडे डोळसपणे बघू या . आपलं नक्की काय चुकलं याचा किंवा काय बरोबर होतं , जे आपण खूप दूरवर विसरून आलो . याचा विचार करू या शांतपणे . आणि ठरवू या . पुढल्या पिढ्यानी असं करता कामा नये . खूप साधं जगावं.
सोपं जगावं . गर्दीच्या मानसिकतेला मुलू नये . गर्दी निर्माण करणाऱ्या ठगांपासून सावध राहावं . आपलं जगणं आपण स्वतंत्रपणे विकसित करावं . मनाला आवर घालावा . मोह टाळावा . आयुष्य छोटं का असेना पण ते सुंदर कसं करता येईल हे बघावं . आता माणसामाणसात भेद नको . कोरोनानं आपल्याला हे देखील शिकवलं की सामाजिक दुरावा किती क्लेशकारक असतो ते . तेव्हा तो आता आपल्यात कधीच नको .
आता तिसरी लाटही येणार म्हणून सांगतात . पण असं थोडंच होणार आहे . अशी आपोआप कशी येईल ती ? आता आपण तयार आहोत आपली शस्त्र घेऊन . आता न घाबरता सर्वानी लस घ्यायचीच . ‘ मास्क आणि दोन हात लांब ‘ हे महत्वाचं क्षेपणास्त्र जवळ आहेच . आणि मनाला मोकाट होऊ द्यायचं नाही . हे जर आपण सर्वांनी मिळून केलं तर तिसरी लाट येणं शक्य नाही .(स्रोत:दिव्य मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज