टीम मंगळवेढा टाईम्स ।
रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील शिल्लक रक्कम व इतर दोन बँकांमधील बँकेच्या खात्यातील पाच कोटी ५७ लाख दोन हजार ८२२ रूपयांच्या अपहारप्रकरणी संशयित आरोपी तत्कालीन शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू (रा . सांगोला महाविद्यालयाजवळ, कडलास रोड, सांगोला) यास ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक एस.जी. बोठे यांनी बुधवारी अटक केली.
राजगुरू यांना आज माढा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
रतनचंद शहा सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद हिरालाल नाझरकर (रा.मंगळवेढा, जि.सोलापूर) यांनी टेंभुर्णी येथील शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू व तत्कालीन कॅशियर अशोक भास्कर माळी या दोघांनी संगनमताने पाच कोटी ५७ लाख दोन हजार ८२२ रूपयांचा अपहार केल्याची फिर्याद टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याविषयी अधिक माहिती अशी, रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत राजगुरू हे ११ नोव्हेंबर २०१४ पासून शाखाधिकारी म्हणून तर कॅशियर म्हणून अशोक भास्कर माळी हे कार्यरत होते.
बँकेने धनराज नोगजा अॅन्ड असोसिएटस् यांच्याकडे लेखापरिक्षणाचे काम दिले होते. त्या लेखापरिक्षणात आर्थिक व्यवहारात विसंगती आढळली. तो अहवाल बँकेकडे सादर केला. बँकेच्या संचालक मंडळाने अहवालावर विचारविनिमय करून सखोल चौकशीसाठी दयासागर सिध्देश्वर देशमाने यांची नियुक्ती केली.
त्यांच्या चौकशीत हातावरील एक कोटी १४ लाख ८७ हजार ८२२ रूपये आणि २०१६ ते २०२० या कालावधीत शाखेच्या बँक ऑफ इंडिया , टेंभुर्णी शाखेच्या खात्यात एक कोटी ९ २ लाख २५ हजार रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टेंभूर्णी शाखेतील दोन कोटी ४९ लाख ९० हजार रुपये , एवढ्या रकमेची तफावत आढळली.
त्यामुळे बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी राजगुरू व तत्कालीन कॅशियर माळी या दोघांनी संगनमताने अपहार केल्याची फिर्याद पोलिसांत दाखल झाली. त्याचा तपास ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.
सहा महिन्यांपासून राजगुरू हे फरार होते. पोलिसांनी अखेर बुधवारी राजगुरूला अटक केली. टेंभुर्णी पोलिसांत याविषयी नोंद घेण्याबाबत पत्र दिले असून त्यामध्ये आज न्यायालयात हजर केले जाईल , असेही नमूद करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज