टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या भरती परीक्षेतील उमेदवारांची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. त्यानुसार लवकरच निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, पेसा कायद्यानुसार राज्यातील 13 जिल्ह्यांतील निवड प्रक्रियेबाबत याचिका दाखल असल्याने त्याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासनाच्या मान्यतेनंतर यादी करण्यात येणार आहे.
मात्र, उर्वरित 23 जिल्ह्यांतील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात आले आहे.
मागील वर्षी राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने 4 हजार 644 तलाठी पदांसाठी अर्ज मागविले होते. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार खुल्या गटात एक हजार तर इतर गटांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले होते.
उमेदवारांनी 11 लाख 50 हजार 265 अर्ज प्राप्त झाले होते. दाखल अर्जांपैकी सुमारे दहा लाख उमेदवारांनी शुल्क भरले आहे. जे उमेदवार परीक्षा शुल्क भरतील, तेच परीक्षेसाठी पात्र असल्याचे भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
दाखल अर्जांपैकी साडेआठ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली. मागील चार महिन्यांपूर्वी झालेली ही परीक्षा उमेदवारांच्या जास्त संख्येमुळे राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली गेली. तीन सत्रांत ही परीक्षा पार पडली. सुमारे 5 हजार 700 प्रश्न परीक्षेसाठी होते. ही परीक्षा प्रक्रिया 20 दिवस झाली.
दरम्यान, तलाठी या पदाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांतील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू केले आहे.
पेसा कायद्यानुसार 13 जिल्ह्यांतील भरती प्रक्रियेची यादी करण्याचे काम सामान्य प्रशासनाच्या मान्यतेनंतर करण्यात येणार आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त तथा प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक सरिता नरके यांनी दिली.
महसूल विभागाच्या भूमिअभिलेख विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये काही उमेदवारांना 200 हून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे या गुणवत्ता यादीत गडबड असल्याचा संशय काही उमेदवारांनी घेतला आहे.(स्रोत:पुढारी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज