मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
उन्हाळ्याच्या झळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जलजीवन मिशनचे काम अर्धवट असल्याने, गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.
यातूनच पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे येथील ग्रामस्थांनी सरपंचाचे हात बांधून, त्याच्या शर्टवर ‘बेईमान सरपंच’ लिहून त्याला उपविभागीय कार्यालयात आणले व प्रशासनाला जाब विचारला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पुसद तालुक्यातील माळपठारवर उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाई तीव्र होते. माळपठारावरील ४० गावे तीव्रपाणीटंचाईच्या छायेत आहेत. या गावामध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
मात्र अनेक गावात ही कामे कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे व निधीअभावी अर्धवट आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माळपठारावरील सावरगाव गोरे येथील सरपंच प्रताप बोडखे यांना पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या रोषाचा तीव्र सामना करावा लागला.
संतप्त नागरिकांनी त्यांचे हात बांधून व महिलांनी घागर मोर्चा काढत पुसद उपविभागीय कार्यालयावर धडक दिली.
नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून केंद्र सरकारने ‘जलजीवन मिशन’ योजने अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून ‘हर घर नल, हर घर जल’ ही महत्वाकांक्षी योजना सन २०२२ पासून सुरू केली होती.
परंतु तालुक्यातील अनेक गावांत ‘जलजीवन मिशन’च्या पाणीपुरवठा योजनेची कामे अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना देण्यात आल्याने या जलजीवन मिशनच्या योजनेचे कामे अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे केंद्र सरकारच्या ‘हर घर नल, हर घर जल’ या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच माळ पठारावरील नदी, नाले कोरडे पडल्याने या परिसरातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे सावरगाव गोरे येथील संतप्त नागरिकांनी सरपंचांनी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने त्यांचे हात चक्क दोराने बांधून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत अनोखे आंदोलन केले. त्यानंतर तहसील कार्यालय आणि पंचायत समिती येथे घागर मोर्चा काढण्यात आला आहे.
पुसद पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत व आंदोलकांशी चर्चा केली. जलजीवन मिशन योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यास फोनवर संपर्क करून माहिती घेतली.
आंदोलन बराच वेळ चालले परंतु यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे नागरिक हताश झाले. यापुढे हे आंदोलन तीव्र करणार असून राज्यमंत्र्याच्या घरावर घागर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.
सरपंच म्हणतात, आश्वासन पूर्ण करू शकलो नाही
ग्रामपंचायत निवडणुकीत उभा राहिलो तेव्हा सहा महिन्याच्या आत गावातील पाण्याची समस्या सोडविल, असे आश्वासन दिले होते. परंतु जलजीवन मिशनचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच सकाळपासूनच गावातील महिला व पुरुषांचा रोष मला सहन करावा लागत आहे.
माझ्या घरासमोर दररोज नागरिक येऊन मला आश्वासनाची आठवण काढून देत आहेत. नाईलाजास्तव माझ्याकडून या कामाची पूर्तता न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी हात दोरीने बांधून उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणले, अशी प्रतिक्रिया सरपंच प्रताप बोडखे यांनी या आंदोलनानंतर दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज