मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन। जगभर कोरोनाने थैमान घातले असताना मंगळवेढा शहर व तालुक्यातही रात्रंदिवस कोरोनाचीच चर्चा चर्चिली जात आहे. दरम्यानच्या काळात एखादी अफवा पसरली की लगेच त्या अफवेचा इतका विपर्यास होतो की जणू कोरोनाचे निदानच झाले आहे की काय? असा प्रश्न नागरिकांना पडत असल्याने अफवेखोरांपासून सावध राहून जोपर्यंत प्रशासन अधिकृतरित्या कोरोनाबाबत खुलासा करत नाही तोपर्यंत कोरोनाची कसलीच चर्चा करू नये अशी मागणी सुज्ञ नागरिकातून होत आहे.
मंगळवेढयात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाबत कोणीतरी एखादी पुडी सोडते आणि तीच अफवा तालुकाभर पसरते आणि शेवटी त्यात कसलेच तथ्य नसल्याचे समोर येते. अफवेमुळे भयभीत झालेले लोक सर्वप्रथम प्रसारमाध्यम प्रतिनिधी, आरोग्य यंत्रणा व पोलिस प्रशासनाला फोन करून आपली खातरजमा करून घेत असल्याने आरोग्य यंत्रणा व पोलिस प्रशासन तसेच पत्रकारांवरीलही ताण दिवसेंदिवस वाढत असल्याची परिस्थिती आहे.
मंगळवेढयात 8 मे रोजी पुण्यातून आलेल्या एका महिलेला ताप व खोकल्याची लक्षणे आढळून आल्यानंतर सदर महिलेबाबतही तालुकाभर चर्चा सुरू झाली असून अगदी तिचे स्वॅब घेतले आहेत व रिपोर्ट ही आला आहे. अशी एक विचित्र अफवा सध्या पसरली असून यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे प्रथमरित्या दिसून येते. सदर महिला ही पुण्याहून आल्यापासून विविध अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र या महिलेला घरामध्येच क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिने स्वतः आपणास त्रास होत असल्याबाबत सांगितल्यानंतर तिला ग्रामीण रूग्णालयात तपासण्यात आले. स्वॅब घेण्याइतपतची लक्षणे तिच्यामध्ये दिसून येत नाहीत. शिवाय मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयात स्वॅब घेण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नाही. शासनाने कोविड सेंटरसाठी निधी जाहीर केला आहे. परंतु तो निधी अजूनही लाल फितीच्या कारभारातच अडकला आहे.
स्वॅब घेण्यासाठी कॅबीनेटची उभारणी करावी लागते.या कॅबीनेटची ऑर्डर देण्यात आली असून अंदाजे 25 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसात ही यंत्रणा उभा राहणार आहे.मंगळवेढयातून स्वॅबसाठी केगाव येथे पाठवले असता तेथे अनेक स्वॅब प्रतिक्षेत आहेत. एक स्वॅब दिला तर किमान पाच दिवस प्रतिक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत सदर महिलेला सोलापूरला पाठवून स्वॅब देणे हे योग्य नसून दोन दिवसात मंगळवेढयातच ही यंत्रणा कार्यरत झाल्यानंतर स्वॅब घेण्याची सोय होणार असल्याचे समजते.परंतु अनेकजण स्वॅब घ्या म्हणून प्रशासनावर दबाव टाकताना दिसत असल्याने कोरोनाची अफवा चांगलीच पसरू लागल्याचे दिसत आहे.
मंगळवेढयातील दोन महाविद्यालये कोरोनासाठी आरक्षित करण्यात आली आहेत मात्र यामध्ये बेडपासून ते कर्मचार्यांपर्यंतच्या यंत्रणेचे नियोजन न झाल्यामुळे आणखी कालावधी लागणार आहे. शिवाय कोरोनाचा रूग्ण आढळला तर त्या रूग्णावर मंगळवेढा येथेच उपचार करावे लागणार आहेत. यासाठी देखरेखी करता असणारा स्टाफ हा बाहेरून मागावा लागणार आहे. या स्टाफच्या राहण्याची व जेवणाचीही सोय करणे तितकेच महत्वाचे आहे.
अशा विविध प्रश्नांवर वेळीच तोडगा निघणे गरजेचे आहे. सर्वांनी कोरोनाच्या लढयात एकत्रितरित्या लढणे गरजेचे असून प्रशासनावरचा ताण कमी करण्यासाठी अफवा पसरू नयेत तसेच प्रत्येकाने स्वतः घरीच थांबून शासनाच्या आदेशाचे पालन केल्यास मंगळवेढेकर कोरोनापासून मंगळवेढयाला रोखू शकतील अशी अपेक्षा जाणकारातून व्यक्त केली जात आहे.
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज