टीम मंगळवेढा टाईम्स ।
घरात खुंटीशी खेळत असताना अचानक अंगातील स्वेटरची दोरी खुंटीत अडकून फास बसल्याने सांगोला तालुक्यातील अचकदाणी अंतर्गत असलेल्या माळीवस्ती येथील नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.
ही घटना काल शनिवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे.सांगोला तालुक्यातील अचकदाणी अंतर्गत माळीवस्ती येथे नागन्नाथ सिताराम शेंडे हे पत्नी, आई, एक मुलगा व एक मुलगी यांच्यासमवेत राहतात.
आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने नागन्नाथ शेंडे व त्यांची पत्नी मोलमजुरी करून उपजीविका करतात. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे सिमेंटच्या चौकटी बनवणाऱ्या कारखान्यात ते अनेक वर्ष काम करत होते.
लॉकडाउननंतर मात्र, त्यांनी परिसरातच मोलमजूरी सुरू केली होती. आज नेहमीप्रमाणे दोघेही पती-पत्नी सकाळी लवकर कामासाठी घराबाहेर पडले होते. त्यांचा नऊ वर्षाचा सोहम नागन्नाथ शेंडे हा मुलगा व त्याची वृद्ध आजी असे दोघेच घरी होते.
थंडीचे दिवस असल्याने सोहम याने अंगामध्ये स्वेटर घातलेला होता. घरातील पलंगाच्या वरील बाजूस असलेल्या मोठ्या खुंटीशी तो खेळत होता.खेळताना अचानक स्वेटर मधील दोरी खुंटी मध्ये अडकली व त्यास फास लागला.
जोराचा फास लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजारील मित्र त्यास खेळायला बोलवण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीला आला.
शेजारील शेतात काम करणारी आई धावत त्या ठिकाणी आली. तिने पोटच्या गोळ्याला त्या अवस्थेत पाहून हंबरडा फोडला. आईच्या आक्रोशाने जमलेल्या लोकांच्याही डोळ्यात अश्रू आले. सोहम शेंडे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरातवस्ती चिकमहूद या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होता.
सोहम हा अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी होता. वाडीवस्तीवर अगदी ग्रामीण भागात शिकत असूनही त्याने इयत्ता दुसरीतच असताना इंग्रजीमध्ये भाषण केले होते, असे त्याचे वर्गशिक्षक बापू खरात यांनी सांगितले.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज