मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या गोष्टीली २८ मे २०२० सहा महिने पूर्ण होत आहेत.महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीने मुख्ममंत्रिपदाची शपथ घेतली तर त्या व्यक्तीला सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरीषदेचे सदस्य म्हणून निवडून येणे अनिवार्य आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानुसार त्यांना सहा महिन्याच्या आत म्हणजे २८ मे २०२० च्या पूर्वी दोनपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून यावे लागणार आहे
पण संपूर्ण देशासह महाराष्ट्र सरकार कोरोनाशी लढत आहे. अशा परीस्थितीत विधानपरीषदेची निवडणूक होणे शक्य दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे मुदतीपूर्वी दोनपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून न आल्यास त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
राज्यातील महाविकास आघाडीसमोर उद्भवलेल्या या परीस्थितीबाबत राज्य विधीमंडळ सचिवालयाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे म्हणतात, सामान्यपणे विद्यमान विधानपरीषद सदस्यांची मुदत संपण्याच्या ३० दिवस आधी निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने करणे अपेक्षित आहे आणि २४ एप्रिल २०२० रोजी विधानपरीषदेतील आठ जागा रिक्त होत आहेत.
म्हणजे २४ एप्रिल २०२० रोजी संपुष्टात येत असलेल्या जागांसाठीची निवडणूक ३० दिवस आधी म्हणजे २४ मार्चला घोषित होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. सध्या कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती पाहता निवडणूक केव्हा घोषित होईल, याबाबत कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे विधानपरीषदेची निवडणुकीची घोषणा सध्यातरी होणे शक्य दिसत नाही.
पण यामध्ये एक संधी सरकार घेऊ शकते. ती म्हणजे या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या लढ्यात यश आले आणि परीस्थिती नियंत्रणात आली. तर सरकार विधानपरीषदेच्या निवडणुकीची घोषणा करू शकते आणि २८ मे २०२० च्या पूर्वी निवडणूक घेऊन उद्धव ठाकरे आमदार म्हणून निवडून येऊ शकतात. तेव्हा ते मुख्यमंत्रिपदी कायम राहू शकतील.
२८ मे २०२० च्या पूर्वी निवडणूक घेणे शक्य झालेच नाही, तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होईल. अशा परीस्थितीत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन पुढचे सहा महिने मिळवू शकतात. त्यावेळी संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागेल, असे श्री अनंत कळसे यांनी सांगितले.
विरोधक सक्रिय होण्याची शक्यता
कोरोनाशी लढाई कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे राजीनामा देऊन पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करतीलही. पण यावेळी त्यांचे विरोधक सक्रीय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती भविष्यात उद्भवल्यास महाराष्ट्र विकास आघाडी कोणते निर्णय घेऊन कशी खेळी करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज