टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले असून शिवजयंती साजरी करा पण गर्दी करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच सण उत्सवावर मर्यादा आलेल्या असून शिवजयंतीच्या उत्सवावर देखील कोरोनाचे सावट कायम आहे. गेल्या दोन वर्षांपासून अशीच परिस्थिती असून आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे.
परंतु उत्सवावर मात्र मर्यादा कायम आहेत. कोरोनाची भीती कायम असून सार्वजनिक कार्यक्रमाना फाटा देवून हा उत्सव साजरा करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत.
शिवजयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दीने हा उत्सव साजरा करू नये असे राज्य सरकारने आवाहन केलेले आहे. त्यानुसार शिवजयंतीसाठी जिल्हाधिकारी यांनी काही नियम घालून दिलेले आहेत.
शिवज्योत आणण्यासाठी २०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे तर शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी ५०० भाविकांना मान्यता देण्यात आली आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने प्रभात फेरी, बाईक रॅली किंवा मिरवणूक काढण्यात येऊ नये, यांच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अथवा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्यात यावे. शिवजयंतीचा उत्सव साजरा करताना आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजाराबाबत माहिती आणि त्याचा प्रतिबंध करणारे उपाय,
स्वच्छता याबाबत जनजागृती करावी असे या आदेशात म्हटले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संघटना अथवा संस्था यांचेवर भारतीय दंड संहिता ४५ ऑफ १८६० कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत देखील आदेशित करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज