मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अशा बोगस दवाखाने थाटणार्या मुन्नाभाईंच्या तत्काळ मुसक्या आवळा, असे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. सोमवारी तातडीने मंत्रालयात वैद्यकीय विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली आणि या सूचना दिल्या. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने हे या बैठकीला उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असल्याने प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र भरारी पथक तयार करण्यात येणार असून ते अशा दवाखान्यांवर धाडी मारणार आहेत याशिवाय अशा दवाखान्यांचा शोध लागावा म्हणून जनतेसाठी एक खुला टोल फ्री क्रमांक तयार करण्यात येणार असून त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
मुंबई शहरात 20 हजारांपेक्षा जास्त बोगस डॉक्टर असल्याचा अहवाल महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिला आहे. तर राज्यभरात 60 हजार बोगस डॉक्टर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रशासकीय आणि पोलिस दस्तऐवजानुसार 2019 या वर्षभरात 78 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.प्रत्यक्षात संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजारांहून अधिक बोगस डॉक्टर असल्याचा प्रशासकीय अंदाज आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात सहा हजार 867 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सूत्रानुसार राज्यभरात सात हजाराहून अधिक डॉक्टरांचे दवाखाने असल्याचे सांगण्यात आले. याची गंभीर दखल घेऊन याबाबत पावले उचलण्यास सुरवात करण्याच्या सूचना देशमुख यांनी दिल्या आहेत. अशा डॉक्टरांवर यापूर्वी कारवाई करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र अटकेनंतर सुटका झाल्यावर ते इतरत्र जाऊन आपले दुकान पुन्हा थाटतात. त्यामुळे यावर कडक उपाययोजना करण्याबाबत प्रशासन विचार करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज