मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शासनाच्या आदेशानुसार सिंगल यूज प्लास्टिकमुक्त कृती आराखड्यानुसार महापालिकेच्या पथकाने शहरातील आठ हॉस्पिटल्सवर प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची कारवाई केली आहे. चार व्यापारी, शिंदी विक्री दुकान, अय्यंगार बेकरी आणि एका कँटीनलाही प्रत्येकी पाच हजारांची दंडाची कारवाई करत 149 किलो प्लास्टिक जप्त केले असून, संबंधितांकडून प्लास्टिक वापरणार नसल्याचे हमीपत्र घेण्यात आले आहे.
महापालिकेच्या अन्न व परवाना विभागाकडून शासन निर्देशानुसार शहरात बंदी असलेल्या सिंगल युज प्लास्टिक वापरकर्त्यांवर कारवाई सुरू आहे. निर्मल, दीप, यशोधरा, कोठाडिया, सिटी, झांबरे, अंबिका, चिरायु या शहरातील हॉस्पिटल्सवर कारवाई करत प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये महापालिकेच्या पथकाने संबंधितांकडून 149 किलो प्लास्टिक जप्त केले आहे. महापालिकेच्या 80 कर्मचार्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सोलापूर शहरात ही कारवाई निरंतर सुरू राहणार असून बंदी असलेले सिंगल युज प्लास्टिक कोणीही वापरू नये; अन्यथा दंडासह फौजदारी कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे अन्न व परवाना विभागाचे अधीक्षक श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले. मुख्य आरोग्य निरीक्षक एन.सी. बिराजदार, केदार गोटे, सूर्यकांत लोखंडे, महादेव शेरखाने आदींचाही सहभाग आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज