टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत झालेला कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात व राजकीय टीकाटीपण्णी न होता पार पडला. सर्वच नेत्यांनी दाखविलेली राजकीय प्रगल्भता हा बारामतीत काल चर्चेचा विषय होता.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लंच डिप्लोमसीचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धाडलेले पत्र, पवारांचे निमंत्रणपत्रिकेवर नाव नसणे व पुन्हा त्यांना निमंत्रणपत्रिकेवर सन्मानाचे स्थान देणे, व्यासपीठावर शरद पवार यांचा राज्य शासनाने सन्मान ठेवणे या सर्व पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष होते.
प्रत्यक्षात राजकारणविरहीत असाच हा कार्यक्रम झाला. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणविरहीत हा उपक्रम असल्याचा केलेला उल्लेख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या उपक्रमासाठी सरकारची केलेली प्रशंसा व अशा कामात कायम साथ देण्याची ग्वाही या मुळे हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत येणार म्हटल्यावर राजकीय फटकेबाजी होईल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात विद्यार्थी व रोजगारप्राप्त उमेदवार समोर असल्याने सर्वांनीच राजकीय टीपण्णी टाळली.
आणि झाला एकच जल्लोष…..
ज्येष्ठ नेते शरद पवार व्यासपीठावर येताच युवकांनी जोरदार जल्लोष केला. त्यांनी हात उंचावून अभिवादन केल्यानंतर आणि ते भाषणाला उभे राहिल्यानंतर उपस्थित युवकांनी जोरदार जल्लोष करत त्यांच्या प्रती असलेला स्नेहभाव व्यक्त केला.
…पण गृहखाते देणार नाही.…
बारामतीतील पोलिस दलाच्या सुसज्ज इमारतींवर खूष झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात राज्यातील सर्वच पोलिस दलाच्या इमारती अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने बांधू असे सांगितले, ते हळूच म्हणतील मग गृहखातेही मलाच देऊन टाका….पण असे होणार नाही, खाते मिळणार नाही अशी गंमतीदार कोटीही फडणवीस यांनी केली. बारामतीची सरकारी कार्यालयांना कार्पोरेट लूक असल्याची पावती देत सरकारी कार्यालय चांगलीच असावीत असे नमूद केले.
तिजोरीची चावी तुमच्याकडेच….
बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही देतानाच व्यासपीठावर उपस्थित अर्थमंत्री अजित पवारांना बघून शिंदे म्हणाले, तिजोरीची चावी तुमच्याकडेच आहे, त्या मुळे काही अडचणच नाही, यावर अजित पवारांनाही स्मित हास्य केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज