टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील खासगीसह कोणत्याही लॅबने आरटीपीसीआर या कोरोना टेस्टसाठी जादा दर घेतल्यास महापालिका प्रशासनाकडून कडक अशी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेतील कोरोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख धनराज पांडे यांनी दिला आहे.
आरटीपीसीआर या कोरोना टेस्टसाठी शासनाकडून 2 हजार 200 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. घरी जाऊन रुग्णांची टेस्ट स्वॅब घेतल्यास 2 हजार 800 रुपये दर आहे. परंतु महालक्ष्मी लॅबने टेस्टसाठी 3 हजार रुपये दर आकारल्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी नियंत्रण कक्षाला तक्रार प्राप्त केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशाने 24 तासांत खुलासा द्यावा, अशी नोटीस महालक्ष्मी लॅबला देण्यात आली होती, अशी माहिती नियंत्रण कक्षाचे प्रमुख पांडे यांनी दिली होती.
सरकारच्या नियमानुसार लॅबमधील टेस्टचा दर 2 हजार 200 रुपये असतानादेखील महालक्ष्मी लॅबने तीन हजार रुपये घेतले याबाबत खुलासा करण्याबाबत नोटिसीत कळवले होते. शासनाचा जीआर माहिती नसल्यामुळे आरटीपीसीआर टेस्टसाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीन हजार रुपये घेतले होते, असा खुलासा लॅबने केला. रुग्णाच्या नातेवाईकाला पूर्ण रक्कम परत देण्यात आली असल्याची माहिती महालक्ष्मी लॅबचे प्रतिनिधी यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत स्वॅब तपासण्यासाठी ज्या लॅब जादा दर आकारातील त्यांची तक्रार महापालिकेच्या कोरोना-19 नियंत्रण कक्षाकडे करावी. जादा दर आकारण्यात येणार्या लॅबवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोरोना कक्षाचे प्रमुख पांडे यांनी दिला आहे.
अनेक दवाखान्यांची बिले तपासणीत झाली कमी
खासगी दवाखान्यांत उपचार घेणार्या कोरोना रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी होत्या. आरोग्यमंत्र्यांनी दवाखान्यांच्या बिलाचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटर नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ऑडिटरची नियुक्ती केली होती. खासगी दवाखान्यांतून उपचार घेणार्या कोरोना रुग्णांची जवळपास 73 बिले ऑडिटरनी तपासणी केली असून 2 ते 35 हजार रुपयांपर्यंतची रक्कम तपासणीत कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा, तर दवाखान्यांना चाप बसत आहे.
Action will be taken if more money is taken for corona test in Solapur
( Source : pudhari )
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज