टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूरहून मंगळवेढ्याकडे भरधाव वेगाने निघालेल्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक पादचारी जागीच ठार झाला. अपघातानंतर वाहन न थांबता वेगाने पुढे निघून गेले. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास महामार्गावरील बेगमपूर (ता.मोहोळ) गावाच्या वळण रस्त्यावर घडली.
साहेबलाल मोद्दीन इनामदार (वय ६८, रा. बेगमपूर) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. नंदूर (ता. मंगळवेढा) येथील गावचे मूळ रहिवासी असलेले इनामदार व त्यांचे कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून शेतमजुरी करीत बेगमपूर येथे वास्तव्यास होते.
काल सायंकाळी ते रस्त्याच्या बाजूने पायी निघाले असता सोलापूरहून मंगळवेढ्याच्या दिशेने निघालेल्या पिकअपने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व चार मुली असा परिवार आहे. आठवडाभरापूर्वीच मोहोळ येथील अकिल बागवान या व्यापाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान, ही दुसरी मोठी दुर्घटना घडली.
या घटनेमुळे महामार्ग प्रशासनाच्या विरोधात संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करीत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. महामार्ग प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने केलेली कामे व याबाबत तक्रार करूनही संबंधितांकडून दखल घेतली जात नसल्याने अपघात घडत आहेत.
काल झालेल्या अपघाताला महामार्ग प्रशासनाला जबाबदार धरीत ग्रामस्थांनी सुमारे दीड तास महामार्ग रोखून धरला. महामार्ग प्रशासन अधिकारी आल्याशिवाय मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला.
तोडग्यासाठी कामती पोलिसांची मध्यस्थी
दरम्यान, कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुनगे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी, महामार्ग प्रकल्प संचालक व ग्रामस्थांची बैठक घेऊन मागण्यांबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
दीड तास ग्रामस्थांनी रोखून धरलेली वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूर येथे पाठविण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक डुनगे यांनी निर्माण झालेली परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याने ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने माघार घेतली.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज