मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना तुम्ही संपूर्ण ताकदीने उभं करा. मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यावेळी निवडणूक येईल, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा,
आमच्या सहकाऱ्यांचा, महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार कोण आहे, असा प्रश्न विचारला, तर लोक अभिजितचं नाव घेतील, यासंबंधीची तयारी तुम्ही सुरू करा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातून पाटील यांच्या उमदेवारीचे स्पष्ट संकेत दिले.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात पवार यांनी अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, रवींद्र धंगेकर, कैलास पाटील, संजय शिंदे, यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, बळीराम साठे, उमेश पाटील आदी उपस्थित होते
पवार म्हणाले की, तुम्ही आज अभिजीत पाटील यांना साथ दिली. तुम्ही लोकांनी अभिजित पाटील यांच्यासारखं नेतृत्व तयार केले आहे. या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याची आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे.
नुसतं पाठीशी उभा राहायचं नाही, तर औदुंबरअण्णा पाटील, भारत भालके यांच्यानंतर पंढरपूर तालुका पोरका वाटतो. त्याचे हे पोरकेपण घालवण्याची ताकद आज अभिजित पाटील यांच्यामध्ये आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांना तुम्ही पूर्ण ताकदीने उभं करा.
एकेकाळी हा सोलापूर जिल्हा दुष्काळी होता. पण, (स्व.) यशवंतराव चव्हाण यांनी उजनी धरणाचा पाया घातला आणि त्यातील पाण्याच्या जोरावर आज जिल्ह्यातील उसाची शेती फुलेली आहे.
पहिल्या पिढीने मोठे काम केले आहे. त्यानंतर बबनदादा, राजन पाटील यांच्यासारखी दुसरी पिढीही जिल्ह्यात कार्यरत आहे. आता तिसऱ्या पिढीनेही पुढे येऊन शेती क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन काम केले पाहिजेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
आपल्याकडे आज साखर मोठ्या प्रमाणात पडून आहे. दुसरीकडे, जगात साखरेचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. आपण साखरेची निर्यात केली, तर आपल्या शेतकऱ्याला चार पैसे मिळतील. पण, केंद्र सरकारने साखर निर्यात करायची नाही, असा निर्णय घेतला आहे.
तोच न्याय कांद्याच्या बाबतीतही लागू आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारबाबतही आपल्याला निकाल घ्यावा लागणार आहे. जे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील, त्यांना तुम्हीही ताकद द्या, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे भूमिपूजन झाले. चव्हाण यांच्या धर्मपत्नी विणूताई यांचे नाव या भागाला देण्याचा निर्णय औदुंबरअण्णा पाटील यांनी घेतला. त्यामुळे या भागाला वेणूनगर असे नाव देण्यात आले, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज