टीम मंगळवेढा टाईम्स ।
आपल्या जुळ्या मुलांच्या उपचारासाठी झटणाऱ्या बापावर रुग्णालयाच्या मनमानी कारभारामुळे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. 14 वर्षांनी बाप होण्याचं सुख अनुभवण्यासाठी आसूसलेल्या बापानं रुग्णालयाच्या तगाद्याला कंटाळून स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे.
याप्रकरणी नवी मुंबईतील तेरणा रूग्णालयाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईत वास्तव्यास असलेलं गाढे कुटुंब. गाढे दाम्पत्य जीवापाड कष्ट करून स्वतःच्या संसाराचा गाडा हाकत होते. लग्नाला अनेक वर्ष झाली तर आयुष्यात नव्या पाहुण्यांच्या आगमनाची दोघेही आतुरतेनं वाट पाहत होते.
अखेर लग्नाच्या 14 वर्षांनी गोड बातमी आलीच. गाढेंच्या घरात पाळणा हलला. पत्नीनं गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला.
मात्र, जन्माला आल्यानंतर नवजात बाळांची तब्येत काहीशी नाजुक होती. त्यांना उपचारांची गरज होती. जुळ्या बाळांची तब्येत नाजूक असल्यानं दोघांनाही नेरुळच्या तेरणा रुग्णालयातील अति दक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं.
नेरुळमधील तेरणा रुग्णालयात गाढे दाम्पत्याच्या बाळावर उपचार सुरू होते. तर, दुसरीकडे रुग्णालयाकडून सातत्यानं बिल भरण्यासाठी तगादा लावला होता. नरेंद्र गाढेंनी सुरुवातीला 90 हजार रुपये भरले. पण तरिदेखील रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार बिल द्या, असा तगादा लावला जात होता.
एवढंच नाहीतर आधी बिल भरलं नाही तर, बाळांवर सुरू असलेले उपचार थांबवले जातील, असंही रुग्णालयाकडून सांगितलं गेलं. अखेर रुग्णालय प्रशासन आणि परिस्थितीसमोर हतबल झालेल्या नरेंद्र गाढेंनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
बाळांचे वडील नरेंद्र गाढेंनी गळफास घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयानं वारंवार बिल भरण्यासाठी तगादा लावला होता. यातून नरेंद्र गाढे यांनी आत्महत्या करताना सुसाईड नोट लिहून ठेवली.
या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरावं असंही गाढेंकडून नमूद करण्यात आलं आहे. नरेंद्र गाढे नेरुळमधील मनपा वाचनालयात सुरक्षा रक्षकाचं काम करत होते.
लग्नानंतर तब्बल 14 वर्षांनी नरेंद्र गाढेंच्या घरात पाळणा हलला होता. पण, बाळांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांच्यावर उपचारांची गरज होती.
नरेंद्र गाढेंनी पत्नी आणि जुळ्या मुलांना उपचारासाठी नेरूळ येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी ठेवलं होतं. पण, रुग्णालय प्रशासनानं बिलासाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून गाढे यांनी टोकाचं पाऊल उचललं.
रुग्णालय प्रशासनामुळे गाढे यांनी त्यांच्या मुलांसाठी पाहिलेली अनेक स्वप्न अपूर्णच राहिली. दरम्यान, या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तेरणा रूग्णालयाविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.(स्रोत;ABP माझा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज