मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
इचलकरंजी येथे स्वत:ला पेटवून घेतलेल्या सचिन सुरेशकुमार शर्मा (वय 31, रा. यशवंत कॉलनी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 11 फेब्रुवारीला पहाटे इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात ही घटना घडली होती. उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. त्याने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबावरून गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रेमसंबंधातून त्याने हा प्रकार केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास सचिनने स्वत:ला पेटवून घेतले. त्याच अवस्थेत तो रस्त्यावरून पळत सुटला होता. सुमारे एक किलोमीटरपर्यंत तो रस्त्यावरून पळत होता.
ही घटना पाहणार्यांचाही थरकाप उडाला. त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत तो 91 टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला उपचारासाठी कोल्हापूर इथे हलविण्यात आले होते.
त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची प्राथमिक नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे. सचिनचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत झाले होते. सध्या तो अकौंटिंगच्या कामासोबत मॉडेलिंगही करीत होता.
त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सचिन शर्मा याची एका तरुणीशी मैत्री होती. काही कारणाने त्यांच्यात विसंवाद झाला होता. याच कारणातून सचिनने स्वत:ला पेटवून घेतल्याची चर्चा घटनास्थळी होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज