मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पत्नी नांदण्यास येत नाही, तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून जावयाने सासूवर गवठी कट्ट्यातून बेछूट गोळीबार करून तिला ठार मारले. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सोमवारी (दि.17) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.
सविता सुनील गायकवाड (वय 38) असे मृत महिलेचे नाव आहे. डोक्यात गोळी लागल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. त्यांचे मेहुणे संतोष कचरू उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावई राहुल गोरख साबळे (रा. रांधे ता. पारनेर) याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पारनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, राहुल साबळे व मयत सविता गायकवाड यांची मुलगी अस्मिता यांनी दोन वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. त्यावेळी राहुल साबळे याच्या विरोधात अस्मिताचे अपहरण तसेच अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस पथकाने दोघांना ताब्यात घेतल्यानंतर अस्मिता हिने आम्ही स्वखुषीने विवाह केल्याचा जबाब दिल्यानंतर राहुल व अस्मिता यांचा रांधे येथे संसार सुरू झाला. सात महिने नांदल्यानंतर अस्मिता आईकडे वडझिरे येथे आली व आपणास राहुलकडे नांदण्यास जायचे नाही, असे सांगितले. पोलिसांकडे तसा जबाबही तिने दिला. त्यानंतर राहुल यास समज देण्यात येऊन हे प्रकरण मिटविण्यात आले. त्यानंतर मात्र राहुल हा अस्मिताशी संपर्क करीत असे. आपल्या पत्नीस तिची आई नांदण्यास पाठवित नसल्याची तक्रारही त्याने दिली होती. याच वादातून त्याने पोलिस ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले होते. पोलिसांनी त्यास वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले होते.
पारनेर येथे मोबाईल शॉपीचा व्यवसाय करणार्या राहुल याची पारनेरला कॉलेजमध्ये येणार्या अस्मिताशी ओळख झाली. लोणीमावळा येथे दोघांचेही मामा एकाच मळ्यात राहत असल्याने, दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पुढे अळकुटी येथे त्याने आपले दुकान सुरू केले. लग्नानंतर दोघेही या दुकानात व्यवसाय करीत.
मात्र, दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर राहुल काही काळासाठी पुणे जिल्ह्यात गेला होता. अलिकडेच यात्रोत्सवासाठी आलेला राहुल गावाकडेच रमला. जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करू लागला. पुन्हा अस्मिताशी संपर्क करू लागला. एका मित्रासोबत अस्मितासाठी मोबाईल पाठवून तो तिच्याशी चर्चा करू लागला. त्यानंतर राहुल याच्याविरोधात सोमवारी (दि.17) दुपारी तक्रार करण्यात आली होती. तक्रार करण्यात आल्याचे समजल्यानंतर संतापलेल्या राहुल याने पोलिस ठाण्यात जाण्याऐवजी वडझिरे येथे जाऊन, सासू सविता गायकवाड यांच्यावर गावठी कट्ट्यातून बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये सविता यांच्या डोक्यात, खांद्यास, तसेच हातास गोळ्या लागल्या व त्या जागीच गतप्राण झाल्या. हल्ला केल्यानंतर राहुल तेथून दुचाकीवरून पसार झाला.
दरम्यान, घटना घडल्यानंतर प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, वाघ, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, बालाजी पद्मने यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या. आरोपी राहुल याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आली असून, अद्याप त्याचा तपास लागलेला नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज