मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
केंद्र सरकारची भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलचे खासगीकरण होणार, अशी चर्चा सुरू असतानाच एक पाऊल पुढे टाकत बीएसएनएलने फोर-जी सेवा लवकरच सुरू करण्याची घोषणा केली आहे. एप्रिलपासून पुण्यातील ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
पुणे विभागाद्वारे फोर-जी नेटवर्कची सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी ‘अपग्रेडेशन’ सुरू आहे, असे कंपनीच्या केंद्रिय मनुष्यबळ विभागाचे संचालक अरविंद वडनेकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात बीएसएनएलच्या फोर-जी स्पेक्ट्रस देण्यासाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याने बीएसएनएलने फोर-जी नेटवर्कची तयारी सुरू केली आहे.
गेल्या तीन वर्षांत बीएसएनएल ला फोर-जी स्पेक्ट्रम देण्यासाठी केंद्र सरकारने सातत्याने विरोध केल्याने अनेक खासगी कंपन्यांनी बीएसएनएलचे ग्राहक आपल्याकडे ओढून घेतले.
सुमार दर्जाच्या नेटवर्कचा ठपका ठेवून ग्राहकांनीही बीएसएनएलची साथ सोडली होती. मात्र आता बीएसएनएलने फोर-जी नेटवर्क सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर गेलेले ग्राहक पुन्हा एकदा जोडण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर असेल.
मोबाइलधारकांसाठी आकर्षक प्लॅन्स तयार करण्यात येणार असून, रास्त दरात फोर-जी नेटवर्कची सेवा देण्यात येणार आहे. फोर-जी स्पेक्ट्रम जरी उशिरा आले असले, तरी यातून बीएसएनएलचे ग्राहक वाढणार असून उत्पन्नातही चांगली वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज