मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्यातील प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक ( कनिष्ठ महाविद्यालये ) आणि अध्यापक महाविद्यालयातील कार्यरत शिक्षणसेवकांच्या मानधनात किमान दुपटीने वाढ करण्यात आली आहे . राज्यातील विविध स्तरातील विद्यालयांमधील कार्यरत शिक्षणसेवकांना सन २००० – २००१ या वर्षापासून मानधन देण्याचे आदेश शासनाने दिले होते . प्राथमिक शिक्षकांना आणि माध्यमिक शिक्षकांना अनुक्रमे ३ आणि ४ हजार रुपये व उच्च माध्यमिक शिक्षकाना५हजार रुपये मानधन दिले जात होते .
या मानधनात किमान दुपटीने वाढ करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने त्यांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांना अनुक्रमे ६ हजार आणि ८ हजार रुपये व उच्च माध्यमिक शिक्षकांना ९ हजार रुपये मासिक मानधन यापुढे मिळणार आहे . यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे .
राज्यातील शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे . या वेतन आयोगातील तरतुदीनुसार मूळ वेतनात २ . ५७ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे . सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत . त्यामुळे मानधन तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांनाही देखील वाढती महागाई विचारात घेऊन त्यांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय झाला , असे पुणे येथील शिक्षण संचालक ( प्राथमिक ) दत्तात्रय जगताप यांनी सांगितले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज