मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसतेय. मात्र संचारबंदीचा फायदा उचलत काही तळीरामांनी चक्क दारूच्या दुकानावरच डल्ला मारला आहे. दारुड्यांनी आपली तलफ भागवण्यासाठी अनेक ठिकाणी दारुची दुकानचं फोडली आहेत. यातील काही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाल्या आहेत.
सोलापुरात महागड्या दारुला हातही लावला नाही
सोलापुरातील विजापूर रोड येथील असलेल्या गुलमोहर दारूचे वाईन शॉप फोडत दारूची चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये चोरट्यांनी जवळपास 57 हजार रुपयांची दारू चोरून नेली आहे. विशेष म्हणजे या दुकानात महागड्या दारूच्या बाटल्या देखील होत्या. मात्र या तळीरामांनी महागड्या दारूला हाथ देखील लावला नाही. ते रोज पित असलेल्या विशिष्ट ब्रँडच्याच दारूच्या बाटल्या चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास येत आहे. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करायला सुरुवात केली आहे. घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज घेतले असून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान सोलापुरातील विजापूर नाका पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीत देखील कोरोनामुळे संचारबंदी असल्याने तळीरामांची मोठी गोची झाली आहे. दारूसाठी व्याकुळ झालेल्या तळीरामांना सांगली आणि मिरजेत थेट बंद असलेली 2 दारूची दुकाने फोडून दारूच्या बाटल्या लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागांकडून सांगली जिल्ह्यात सर्व दारू दुकानांना सील ठोकून बंद केलं आहे. कुठेच दारू उपलब्ध होत नाही. त्यामुळे मद्यपींची मोठी गोची झाली आहे. यातूनच सांगली आणि मिरजेत तळीरामांनी थेट देशी दारूची दोन दुकाने फोडली आहेत. या देशी दारू दुकानामधून दारूच्या बाटल्या चोरल्या आहेत. याबाबत दारू दुकानदारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती दिली.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या दोन्ही दुकानांना पुन्हा मोठी कुलप लावून सील करण्यात आले आहे.
तळीरामांना दारु पुरवण्यासाठी विरारमध्ये चक्क सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला. इंस्टाग्राम सोशल नेटवर्कवर “द लिकर मॅन” या अकाऊंट द्वारे हा ग्रुप चढ्या दराने दारू विक्री करत होता. बियर विस्की, स्कॉच अशा दारुची फोटो टाकून त्याचे रेटही लिहून ठेवले होते. कुणाला पाहिजे असेल तर फोन नंबर दिला होता. याची माहिती विरार पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून दारु विकत घेण्याच्या बहाण्याने या टोळीचा भांडाफोड केला. यात संतोष मोहंती व आकाश सावंत यांना अटक करण्यात आली आहे. तर चिका नामक व्यक्ती यात फरार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज