मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. बंद असलेल्या अनेक उद्योग व व्यवसायांना आजपासून (शुक्रवार) सवलत देण्यात आली आहे.
याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी 20 मे रोजी घेतला असून 22 मे ते पुढील आदेश होईपर्यंत हा सुधारित आदेश लागू असणार आहे. या आदेशामुळे ग्रामीण भागातील व बिगर प्रतिबंधीत क्षेत्रातील क्रीडा, संकुल, स्टेडियम तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक, सर्वासाठी खुल्या असणार आहेत.
प्रेक्षक, सांघिक क्रीडा प्रकार करण्यास मनाई असणार आहे. सर्व शारीरिक व्यायाम इतर उपक्रम सोशल डिस्टन्स पाळून करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून तीन चाकी वाहन एक अधिक दोन व्यक्तींसाठी आणि चार चाकी वाहन एक अधिक दोन व्यक्ती या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.
मंगळवेढ्यातील दुकाने सुचनांसह उघडण्यास परवानगी
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 22 मे 2020 पासून मंगळवेढयातील सर्व दुकाने सुधारित सुचनांसह उघडण्यास परवानगी देण्यात आली असून सर्वांनी शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे.
पाटील म्हणाल्या, सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये परवानगी देण्यात आलेल्या उपक्रमामध्ये जीवनावश्यक वस्तूसह यापुर्वी परवानगी दिलेले सर्व उद्योग सकाळी 9.00 ते 5.00 वाजेपर्यंत सुरु राहतील तसेच नविन सुधारीत आदेशानुसार केश कर्तनालयास परवानगी देण्यात आली असून हॉटेल व्यवसायिकांना पार्सल देण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक करणार्यांसाठी दुचाकीवर केवळ एक चालक,तीन चाकी वाहनांमध्ये एक अधिक दोन,तर चाकी वाहनांमध्ये एक अधिक दोन अशा स्वरूपाची परवानगी देण्यात आली असून सर्व मार्केट व दुकाने ही सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत उघडी राहतील परंतू कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर न पाळल्यास किंवा गर्दी केल्यास शासकीय यंत्रणेकडून असे उद्योग व्यवसाय बंद करण्यात येतील.
अत्यावश्यक कामासाठी सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेतच नागरिकांना घराच्या बाहेर पडता येईल अन्यथा संचारबंदी लागू असेल. कोरोनाचा प्रसार लवकर ओळखण्यासाठी व संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही पल्लवी पाटील यांनी सांगितले.
—————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज