मंगळवेढा टाईम्स न्युजनेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि जलस्रोतांचे नियोजन प्राधान्याने करावे. केसरी रेशन कार्डधारकांना शासन निर्णयानुसार पुढील तीन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात यावे. यासाठी उर्वरित लाभार्थ्यांचे आधार सीडिंग तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात टंचाईच्या अनुषंगाने आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभवेंद्र खांडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे उपजिल्हाधिकारी (रोहयो) अंजली मरोड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात ३ लाख २५ हजार केसरी रेशन कार्डधारक आहेत. त्यापैकी सुमारे ४० टक्के लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित ६० टक्के लाभार्थ्यांनी तातडीने आधार सीडिंग करून घ्यावे यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी गावपातळीवर विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

१६ लाख जणांना दरमहा लाभ
जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत सुमारे १६ लाख ५० हजार लाभार्थ्यांना दरमहा मोफत अन्नधान्य वितरित केले जाते. त्याचप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने केसरी रेशन कार्डधारकांनाही पुढील तीन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे.

टंचाईचा ९० कोटींचा आराखडा
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ८५३ गावे आणि २५५ वाड्यांसाठी एकूण ४ हजार ४४८ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी २० कोटी ६७ लाख रुपयांचा आराखडा तयार केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














