टीम सोलापूर ।
विश्वासाने कसण्यासाठी (बटईने) दिलेली तब्बल २० एकर शेतजमीन माजी आमदार दीपक साळुंखे पाटील आणि त्यांच्या मुलाने परस्पर स्वतःच्या व ट्रस्टच्या नावावर करून हडपल्याचा खळबळजनक आरोप एका वृद्ध दाम्पत्याने केला आहे.

वयाच्या ७५ व्या वर्षी न्याय मिळवण्यासाठी दिलीप पाटील आणि लिलावती पाटील या निपुत्रिक दाम्पत्याला थेट व्हीलचेअरवरून पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठावे लागले. या संपूर्ण प्रकरणामुळे सोलापूरच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?
तक्रारदार दिलीप पाटील आणि लिलावती पाटील (वय ७५ वर्षे) यांना अपत्य नाही. त्यांनी उपजीविकेसाठी आपली सुमारे २० एकर शेतजमीन माजी आमदार दीपक साळुंखे यांना बटईने कसण्यासाठी दिली होती.

मात्र, उतारवयाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत माजी आमदार साळुंखे व त्यांचे सुपुत्र सूर्यादित्य दीपक साळुंखे यांनी ही कोट्यवधी रुपयांची जमीन संगनमताने परस्पर मुलाच्या नावावर करून घेतली, असा थेट आरोप या दाम्पत्याने पत्रकार परिषदेत केला.

गुन्हा अंगलट येण्याच्या भीतीने ट्रस्टकडे जमीन वर्ग?
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या वृद्ध दाम्पत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. ही कायदेशीर तक्रार अंगलट येण्याची चाहूल लागताच, साळुंखे पिता-पुत्रांनी ती जमीन घाईघाईने एका ट्रस्टच्या नावावर वर्ग केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, ज्या ट्रस्टच्या नावे ही जमीन हस्तांतरित करण्यात आली, त्यामध्येही दीपक साळुंखे यांचा मुलगा सूर्यादित्य साळुंखे हाच सहभागी असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.

जीवाला धोका; मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची याचना
जमीन हडपल्यानंतर आता आपल्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे सांगत या असहाय वृद्ध दाम्पत्याने व्हीलचेअरवरून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत संरक्षणाची मागणी केली आहे.
“आम्ही म्हातारे आहोत, आम्हाला कोणी वाली नाही; सरकारने तातडीने हस्तक्षेप करून आमची वडिलोपार्जित जमीन परत मिळवून द्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा,” अशी आर्त हाक या दाम्पत्याने थेट मुख्यमंत्र्यांकडे लावली आहे.
दरम्यान, या खळबळजनक आरोपांसंदर्भात माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. एका मातब्बर राजकीय नेत्यावर थेट फसवणुकीचे आरोप झाल्याने आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















