टीम मंगळवेढा टाईम्स ।
भीमा नदीकाठची शेतीपिके उजनीच्या पाण्याअभावी होरपळून निघत असतानाच, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
उजनी धरणातून सोडलेले पाणी मंगळवेढा तालुक्यात पोहोचण्यापूर्वीच नदीकाठचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणला दिले आहेत. यामुळे ‘पाणी असूनही ते पिकांना देता येणार नाही’ अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे.

पाण्यासाठी संघर्ष
यंदा सोलापूर शहरासाठी थेट पाईपलाईन केल्यामुळे भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचे प्रमाण घटले होते. परिणामी, जिल्ह्याचा ऊस पट्टा म्हणून ओळखला जाणारा मंगळवेढा तालुका पाणीटंचाईने होरपळून निघाला.

खासदार प्रणिती शिंदे आणि इतर लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेत पाणी सोडण्याची मागणी केली. अखेर २४ एप्रिलला पाणी सोडण्यात आले, मात्र हे पाणी अद्याप मंगळवेढ्यात पोहोचलेले नाही.

जिल्हाधिकाऱ्यांचा ‘तो’ आदेश ठरतोय डोकेदुखी
नदी पात्रात पाणी येत असतानाच, जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र काढून महावितरणला कडक सूचना दिल्या आहेत. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि नदीकाठच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी शेतीपंपाचा उपसा रोखणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

त्यासाठी नदीकाठचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करावा. केवळ अत्यावश्यक कामांसाठी दिवसातून फक्त तीन तास वीजपुरवठा सुरू ठेवावा.
शेतकऱ्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’
कडाक्याच्या उन्हामुळे नदीकाठची पिके आधीच जळून खाक होत आहेत. आता पाणी सोडल्यानंतर ते पिकांना मिळेल अशी आशा असतानाच वीज कापली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शेतीचा बळी दिला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. “पाणी असूनही वीज नाही आणि वीज असली तर पाणी नाही,” अशा विचित्र परिस्थितीत मंगळवेढ्याचा बळीराजा अडकला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












