मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सारखी खुणावत असल्याचं आपल्याला अनेकदा दिसून येतं. आता पुन्हा त्यांच्या हितचितकांनी मुख्यमंत्री पदासाठी आर्जव केलेलं पाहायला मिळतंय.
कार्तिकी एकादशीनिमित्त मिटकरींच्या अकोल्यातील निवासस्थानी भजनाचा कार्यक्रम रंगला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अभंग गात अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली.

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनीही आषाढीला शासकीय महापूजा करायला आवडेल, असं म्हणत शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या सुप्त इच्छेला पुन्हा वाचा फोडली.

आषाढीच्या पुजेची संधी मिळाल्यास आवडेल
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची पूजा केल्यानंतर देवाला काय साकडं घातलं हे लता शिंदे माध्यमांना सांगत होत्या.

महाराष्ट्रात दरवर्षी कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्री पूजा करतात तर आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते.

हाच धागा पकडत लता शिंदेंनी विठ्ठलाकडं आषाढी पुजेची संधी मिळावी, असं साकडं घातलं.

लता शिंदे म्हणाल्या की,”माऊलीचा आमच्यावर आशीर्वाद आहे, आम्ही त्याच्या चरणी मस्तक ठेवू. माझं सौभाग्य आहे, विठ्ठलाने आम्हाला दोन्ही पूजा करण्याची संधी दिली. ज्या अर्थी आम्हाला कार्तिकीची पूजा मिळाली त्या अर्थी साहेबांवर विठ्ठलाचा आशीर्वाद आहे. साहेबांच्या हस्ते आषाढीची पूजा हे मलाच नव्हे तर सगळ्या जनतेला आवडेल.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कार्तिकीच्या पूजेवरून आषाढीच्या पूजेसाठी प्रमोशन व्हावं, ही त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातली इच्छा यानिमित्तानं जाहीर झाली.
त्याचवेळी सर्वांना आठवली ती राज ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठीच्या लाचारीवरून नुकतीच एकनाथ शिंदेवर केलेली टीका.मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करालअसं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.
अमोल मिटकरींचे दादासाठी साकडे
आता पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंना जर आषाढीच्या पूजेची एवढी आस लागली असेल, तर अजितदादांची काय अवस्था असेल याची कल्पना करा. त्यामुळंच असेल कदाचित, पण दादांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरींनी विठ्ठलाला घातलेलं साकडं अधिक थेट, स्पष्ट होतं.

अमोल मिटकरी म्हणाले की, “येत्या आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी, असं साकडं विठ्ठलाला घातलं. माझ्या प्रार्थनेला लवकरच यश येईल हा विश्वास आहे. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हेच आमच्यासाठी विठ्ठलाचं राज्य. आमचा नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर असावा, ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे.”
फडणवीस मोठ्या पदावर जावेत
अजितदादा जर आषाढी एकादशीची शासकीय पूजा करणार, तर मग देवेंद्र फडणवीस काय करणार? आपलं साकडं मान्य करताना विठ्ठलासमोर हा पेच उभा राहू नये, याचीही काळजी मिटकरींनी घेतली होती. फडणवीसांचं काय होणार, याचं उत्तर त्यांच्याकडे तयारच होतं.

देवेंद्र फडणवीस हे केंद्रात आणखी मोठ्या पदावर जावेत. त्यांची लोकप्रियता देशात किती आहे हे बिहारच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना दिसले आहे असं अमोल मिटकरी म्हणाले.
तर आता विठुरायाकडं आषाढीच्या पूजेची संधी मिळावी, यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची साकडी आली आहेत. पुंडलिकाच्या भेटीसाठी स्वतः 28 युगं प्रतीक्षा करणारा विठुराया साकडं घालणाऱ्यांना नेमकी किती प्रतिक्षा करायला लावणार, याचीच आता उत्सुकता
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














