मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एसएससी-एचएससी बोर्ड) यंदाच्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक आता दुसऱ्या शाळा-महाविद्यालयातील असणार आहेत.
दरवर्षी राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविले जाते. त्या अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. पाच ते सात किलोमीटर अंतरावरील शाळांमधील शिक्षक विविध परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक असतील.
वेळप्रसंगी जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. एसएससी-एचएससी बोर्डाने मागील वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘सरमिसळ पद्धती’चा अवलंब केला.
त्यानुसार एका परीक्षा केंद्रावर पाच किमी अंतरावरील विविध शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बसविले. मात्र, परीक्षा केंद्रांवरील बहुतेक पर्यवेक्षक त्याच शाळेतील असल्याने कॉपी प्रकाराला पूर्णत: आळा बसला नसल्याचे दिसून आले.
शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे बंधन घातले, मात्र अजूनही ६० टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत किंवा ते नावालाच असल्याची वस्तुस्थिती आहे.
शेकडो विद्यार्थ्यांनी जेईई, नीट अशा परीक्षांच्या तयारीसाठी खासगी कोचिंग क्लास लावले आणि प्रवेशित महाविद्यालयांमध्ये ते गेलेच नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाने आता कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावरील पर्यवेक्षक, केंद्र संचालकच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
असा असेल नवा पॅटर्न
शहरातील परीक्षा केंद्रांवर पाच ते सात किलोमीटर अंतरावरील ग्रामीणमधील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार आहे. शिक्षकांना केंद्रांवर जाण्यासाठी फार वेळ लागणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. वेळप्रसंगी महापालिका शाळांमधील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे.
गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षेसाठी हा पॅटर्न राज्यभर राबविला जाणार आहे. ग्रामीणमधील परीक्षा केंद्रांवर देखील पाच ते सात किमी अंतरावरील शाळांचे शिक्षक दुसऱ्या केंद्रांवर पर्यवेक्षक म्हणून काम करतील. ते शिक्षक (पर्यवेक्षक) विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता ज्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र आहे, तेथील शिक्षक त्याच केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार नाहीत. एका केंद्रावरील शिक्षक दुसऱ्या केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार आहेत.
काही ठिकाणी एकच केंद्र असल्यास त्या केंद्रावर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नेमण्याचे नियोजन आहे. केंद्र संचालकही दुसऱ्याच शाळेतील असतील.- औदुंबर उकिरडे, सचिव, पुणे विभागीय मंडळ
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज