टीम मंगळवेढा टाईम्स ।
मृत भावाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे मृताच्या भावासह चौघांनी मिळून ०.८१ हे. आर सामाईक शेतजमीन विकून मृताच्या पत्नीची फसवणूक केली. ही घटना एप्रिल २०२४ रोजी उघडकीस आली.
याबाबत, संगीता विश्वास वाघमोडे (रा. चिकमहुद, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयत महादेव मारुती वाघमोडे, नवनाथ मारुती वाघमोडे, बाळू सोपान सरक, सोपान येसू सरक, राजेंद्र सोपान महारनवर (रा. चिकमहुद, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी संगीता वाघमोडे यांचे पती आजारी होते. पती विश्वास मारुती वाघमोडे यांना सोबत घेऊन त्या मंगळवेढा माहेरी आल्या होत्या. दरम्यान, २० जून २००४ साली पती विश्वास यांचे निधन झाल्यानंतर मुलांसमवेत त्या माहेरी मंगळवेढा येथे राहत होत्या.
फिर्यादीचे पती व दीर महादेव वाघमोडे यांनी २५ मार्च १९८६ रोजी महादेव पारसे यांच्या नावावर असलेली चिकमहुद येथील शेतजमीन खरेदी घेतली होती. त्या शेतजमिनीवर दोघांची नावे लागली होती.
एप्रिल २०२४ मध्ये फिर्यादी चिकमहुद येथील शेतात गेल्या असता बाळू सोपान सरक हे शेती करत असल्याचे दिसले. त्यांनी त्यास तुम्ही आमची शेती का करताय असे विचारले असता त्याने तुमची शेती महादेव मारुती बाघमोडे व नवनाथ मारुती वाघमोडे यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांनी सांगोला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीची कागदपत्रे काढून माहिती घेतली असता पती विश्वास मयत झाल्यावर त्यांच्या जागी दीर महादेव वाघमोडे यांनी दीर नवनाथ मारुती वाघमोडे यांना उभे केले.
त्यांच्या दोघांची नावे असलेली चिकमहुद येथील सामाईक शेतजमीन बाळू सोपान सरक यांना खरेदीखताने विक्री केल्याचे दिसून आले.
फिर्यादी, संगीता वाघमोडे यांना मच्छिंद्र व श्रीरंग वाघमोडे दोघेही (मयत), सदाशिव वाघमोडे, दादासो वाघमोडे, महादेव वाघमोडे (मयत), अर्जुन वाघमोडे, भानुदास वाघमोडे, नवनाथ वाघमोडे, राजेश वाघमोडे असे एकूण ९ दीर आहेत. त्यापैकी दीर महादेव मारुती वाघमोडे हेही ४ डिसेंबर २०१८ रोजी रोजी मयत झाले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज