टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी अपेक्षेप्रमाणे मोठे मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा कायम काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे.
तरीही या मतदारसंघातून मागील काही निवडणुकांमध्ये भाजपला मताधिक्य मिळाले होते. त्याच्या जोरावर भाजपने सलग दोनवेळा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते.
तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रीक करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. काँग्रेसच्या या विजयामुळे अनेकांचे विधानसभेचे गणित बिघडणार, हे निश्चित आहे.
महायुतीसोबत तीन माजी मंत्री, पाच विद्यमान आमदार, अनेक माजी आमदार, साखर सम्राट, ठेकेदारांचा मोठा फौजफाटा, राज्य पातळीवरील यंत्रणा व आरएसएसचे योग्य नियोजन यामुळे भाजपा यावेळीही सहज विजय मिळवत हॅट्ठीक करेल, असे चित्र होते.
मात्र प्रचारात लोकांमध्ये आरक्षण, महागाई, शेतमालाला हमीभाव, रोजगार यावरून सुरू असलेला आक्रोश यामध्ये विकास हा मुद्दा रूजवण्यात भाजप नेते कमी पडले. भाजपला सोपी असलेली ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे अवघड होत गेली.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना ४५ हजारांचे मताधिक्य
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावांमधून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना ४५,४०२ मताधिक्य मिळाले आहे. यामुळे या मतदारसंघातील भाजपाचे आजी-माजी आमदार फेल ठरले आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भाजप नेत्यांकडे तीन कारखाने तसेच आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक हे आजी-माजी आमदार असूनही या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे.
विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पांडुरंग साखर कारखान्याचा परिवार मोठा आहे. त्याचबरोबर आवताडे साखर कारखाना आ समाधान आवताडे यांच्याकडे आहे.
असे असतानाही काँग्रेसचे २५ फेऱ्यांमध्ये १ लाख २४ हजार ६९१ मते तर भाजपाचे राम सातपुते यांना ७९,२८९ मते मिळाली आहेत. या २५ फेऱ्यांपैकी तिसऱ्या फेरीत २४६, तर पाचव्या फेरीत ३०२० मताधिक्य मिळाले आहे. तर २३ फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना ४५,४०२ मताधिक्य मिळाले आहे.
विजयाची कारणे
• भाजपाच्या तुलनेत काँग्रेसकडे एकही मोठा नेता नसताना त्यांनी छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार यंत्रणा राबवली.
सोबत महागाई, रोजगार, शेतमालाचा हमीभाव, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव, खतांच्या किमती आदी मुद्दे घेऊन सामान्यांपर्यंत पोहोचवले.
मराठा, धनगर आरक्षणाचा मुद्दा, भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलेल हे पटवून सांगण्यात काँग्रेस यशस्वी ठरली.
पराभवाची कारणे
साखर कारखानदारांवर धाडी टाकून त्यांना डांबून ठेवण्याचे सुरू असलेले सत्र यामुळे लोकांमध्ये नाराजी होती.
पक्ष, नेते फोडाफोडीवरून सुरू असलेल्या राजकारणाला नागरिक वैतागलेले होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज