टीम मंगळवेढा टाईम्स।
सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधीत झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी सात हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणातील आरोपी तथा तलाठी सुरज रंगनाथ नळे याच्या पोलीस कोठडीत पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने एक दिवसाची वाढ केली आहे.
दरम्यान ज्या शेतकर्यांच्या रक्कमाबाबत तक्रारी असतील त्यांनी थेट कागदपत्राच्या पुराव्यासह सोलापूर लाचलुचपत विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन तपासिक अंमलदारने केले आहे.
यातील फिर्यादी यांची कमलापूर हद्दीतील गट क्र.52 मधून सांगली-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग गेल्याने नुकसान भरपाई पोटी 1 लाख 43 हजार 794 रुपये मंजूर झाले होते.
मंजूर रक्कम देण्यासाठी दलाल तथा झीरो कर्मचारी पंकज चव्हाण (रा.शेलेवाडी) यांच्या मार्फत सात हजाराच्या लाचेची मागणी करुन ती तलाठी सुरज नळे याने स्वीकारली होती.
तपासिक अंमलदार तथा पोलीस निरीक्षक उमेश महाडीक यांनी आरोपी नळे यास प्रथम न्यायालयात उभे केल्यानंतर चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत दि.4 रोजी संपल्याने पुन्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.
लाच प्रकरणात सहसा दुसर्या वेळेस पोलीस कोठडी मिळत नसल्याचा अनुभव आहे. यामध्ये मात्र न्यायालयाने दोन वेळा पोलीस कोठडी सुनावल्याने चौकशीला चांगलाच वेग आला आहे.
दरम्यान राष्ट्रीय महार्गात बाधीत झालेल्या शेतकर्यांच्या रक्कमा मंगळवेढा येथील एका बँकेत जमा केल्या जात असल्याने लाच प्रकरणाच्या चौकशी साठी या बँकेच्या मँनेजरची सोलापूर येथील लाचलुचपतच्या कार्यालयात मंगळवारी तब्बल अडीच तास चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शेतकर्यांच्या मंजूर रक्कमा देण्यासाठी आरोपी नळे टक्केवारीत रक्कमा वसूल करीत असत. ही वसूली नेमके कोणाच्या सांगण्यावरुन करीत होता घटनेच्या मुळाशी व लोकेशन काढून चौकशी होणे गरजेचे आहे.
एकटा तलाठी एवढे मोठे धाडस कधीही करु शकत नसल्याचा बोलबाला असून त्याला वरिष्ठाचा वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तपासिक अंमलदार याने निपक्ष:पातीपणे चौकशी करुन दूधाचे दूध पाण्याचे पाणी केले तरच शेतकर्यांना खरा न्याय मिळणार असल्याचे मत सुज्ञ नागरिकातून व्यक्त होत आहे.
शेतकरी रक्कम घेतल्यानंतर टक्केवारी देतील की नाही याचा विश्वास नसल्याने कोरे चेक ही वेळप्रसंगी घेतले जात असल्याचे बाधीत शेतकर्यांमधून चर्चीले जात आहे.
परिणामी याची तपासणी करण्यासाठी बँक अधिकार्याकडे तपासिक अंमलदार यांनी अडीच तास कसून चौकशी केली. प्रांत अधिकार्यांची सोमवारी जवळपास साडे तीन तास चौकशी केली असून वेळप्रसंगी अजूनही त्यांना बोलावण्यात येणार असल्याचे तपासिक अंमलदाराकडून सांगण्यात आले.
वृतपत्रात लाचप्रकरणाच्या बातम्या झळकल्यानंतर अनेक बाधीत शेतकर्यांकडून टक्केवारी घेवूनही मंजूर पैसे दिले नसल्याचा सूर निघत आहे.
ज्या शेतकर्यांच्या काही तक्रारी असतील त्यांनी थेट सोलापूर येथील लाचलुचपत विभागाशी पुराव्याच्या कागदपत्रासह लेखी तक्रारी कराव्यात असे आवाहन तपासिक अंमलदार तथा पोलीस निरीक्षक महाडीक यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज